*रशियाचा हुकुमशाह पुतीन आणि तुमच्यात फरक काय ? शरद पवारांचे मोदींवर टीकास्त्र*
पंढरपूर प्रतिनिधी
सत्ता तुमच्या हातात आहे. मात्र तुमच्या विचाराच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यासाठी तुम्ही सत्ता चालवत आहात का? तसे असेल तर रशियाचा हुकुमशाह पुतीन आणि तुमच्यात फरक काय ? आणि रशियामध्ये जी हुकूमशाही आहे ती हळूहळू भारतात आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? असे सवाल करत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार हल्लाबोल केला.
महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी पंढरपूरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. यावेळी व्यासपीठावर प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, भूषणसिंह राजे होळकर, राजे निंबाळकर, प्रवीण गायकवाड, अभिजीत पाटील, यांच्यासह आघाडीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. आज नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता आहे. लोकशाहीमध्ये सत्ता कोणालाही मिळते ती लोकांच्या साठी चालवण्याचा अधिकार असतो. पण मिळालेली सत्ता जमिनीवर पाय ठेवून लोकांच्यासाठी चालवायची भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे. मात्र आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते देशात फिरतायत भाषण देतात, त्यांच्या भाषणांमधून ते नेहरू, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्यावरती टीका करत आहेत. मात्र नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी कोणत्या एका पक्षाचे नेतृत्व करता कामा नये.. त्यांनी देशातील प्रत्येक नागरिक हा आपला आहे आणि त्याची त्याचा विकास करण्याची जबाबदारी आपली आहे ही दृष्टी ठेवणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री सगळ्यांना एकत्र घेऊन चालले पाहिजे. मात्र त्यांची ती भूमिका नाही ते जाहीरपणे जाती धर्मावरती भाष्य करत आहेत. पंतप्रधान मोदी हे ज्या जवाहरलाल नेहरूंनी देशाला लोकशाही पद्धतीने स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्यावर टीका करत असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला.
*चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलू नका*
राहुल गांधी हे एक विकासाभूमिक तरुण राजकारणी आहेत. ते संपूर्ण देश पायी चालत जाऊन देशातील जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असताना देखील त्या राहुल गांधींवर शहाजादा म्हणून टीका केली जाते. मात्र राहुल गांधीनी काहीतरी चांगले काम केलं आहे. कमीत कमी त्यांच्याविषयी चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलू नका, अशा शब्दात पवार यांनी नरेंद्र मोदींचे कान टोचले.
पंतप्रधान मोदींकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. झारखंड झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले, त्याचप्रमाणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील तुरुंगात टाकले, तसेच पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या काही मंत्र्यांवर कारवाई केली, महाराष्ट्रात अनिल देशमुखांवरती कारवाई केली. संजय राऊत यांना तुरुंगात पाठवलं, म्हणजेच मोदी हे एका विशिष्ट विचारसरणीचा आग्रह धरणाऱ्या लोकांसाठी हा देश चालवायचा विचार घेऊन ते आज काम करत असल्याची टीकाही पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवावे, असे आवाहन केले. तसेच सोलापूर आणि माढा या दोन्ही लोक मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून ते जेव्हा दिल्लीत येतील, त्यावेळी त्यांना या दोन्ही मतदारसंघाचा विकास करण्यासाठी जी काही मदत लागेल ती आम्ही दिल्लीत मी आणि माझे सहकारी करतील असे आश्वासनही यावेळी पवार यांनी दिले...