पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये बिझनेस मॉडेल स्पर्धा उत्साहात संपन्न
पंढरपूर - सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी बिझनेस मॉडेल कॉम्पिटिशन ही स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेचे आयोजन इन्स्टिट्युशन्स इनोव्हेशन कौन्सिल (IIC) आणि इनरव्हील क्लब, पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी व उद्योजकीय कल्पनांना चालना देणे हा होता.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे माननीय विवेक अत्रे यांचे भाषण विशेष लक्षवेधी ठरले. त्यांनी उपस्थितांना सांगितले की, "डोळे उघडे ठेऊन काम करा, नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक बना." तसेच, कार्यक्रमाचे पर्यवेक्षक डॉ. अमोल चौधरी यांनीही व्यवसायातील विविध संधीबाबत मार्गदर्शन करत नोकरीच्या मागे न लागता उद्योजकत्व स्वीकारण्याचा आग्रह धरला.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. वैशाली काशिद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल एस. आराध्ये व प्रा. अंजली ए. चांदणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. कैलाश करांडे यांनी सांगितले की, NEP-2020 च्या धोरणानुसार द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोडक्ट डेव्हलपमेंट अँड इंटरप्रिनरशिप या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना बिझनेस व बिझनेस मॉडेल यांचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
याच संदर्भात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी बिझनेस मॉडेल कॉम्पिटिशनचा उद्देश, त्याची रुपरेषा आणि बिझनेस मॉडेलचे विविध प्रकार विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या स्पर्धेमध्ये द्वितीय वर्षामधील ४५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि १२१ हून अधिक गटांनी आपापल्या व्यवसाय मॉडेल सादर केले. प्रत्येक विभागातून दोन गटांना विजेता व रनर-अप पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले.
महाविद्यालयाचे उद्दिष्ट "व्यावसायिक उत्कृष्टता, संशोधन आणि मूल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षणसंस्थान बनणे" असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण विचार आणि उद्योगविश्वातील स्पर्धात्मकता विकसित करण्याची संधी मिळते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मयुरी कुलकर्णी व श्रीया जोशी यांनी केले, तर महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

