*यंदाचे डिपेक्स २०२६ च्या कल्पना सादरीकरण राऊंडचे प्रायोजकत्व कर्मयोगी इन्स्टिट्यूटकडे.*
राज्यस्तरीय कल्पना सादरीकरण स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या सामाजिक नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी डिपेक्स २०२६ चे कल्पना सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची सोलापूर विभागस्तरीय स्पर्धा ४ फेब्रुवारी २०२६ रोजी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,पंढरपूर येथे पार पडणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली
या स्पर्धेची संकल्पना "ग्रामीण विकासासाठी सामाजिक नवोपक्रम" अशी असून, ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सदरची स्पर्धा
"ग्रामीण भारताला सक्षम बनवणे, मुळांना नवोपक्रम देणे "या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात येत आहे.
या स्पर्धेत पदविका, पदवी व आयटीआयचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये अंदाजे २०० प्रकल्प आणी सुमारे १००० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभिनव कल्पना सादर करून ग्रामीण भागातील समस्या व त्यावरील उपाय मांडण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम फेरी दिनांक ५ ते ८ मार्च २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
डिपेक्स २०२६ या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, सर्जनशीलता आणि उद्योजकतेला चालना मिळेल असा विश्वास डिपेक्स २०२६ चे महाविद्यालयाचे संयोजक डॉ. अभय उत्पात यांनी व्यक्त केला आहे.
सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांसाठी पंढरपूर स्टॅन्ड पासून बसची सोय केली आहे.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील अधिष्ठाता, विभाग प्रमुख व सर्व प्राध्यापक परिश्रम घेत आहेत. डिपेक्स २०२६ ही स्पर्धा सृजन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सौजन्याने आयोजित करण्यात येत आहे.

