आमदार समाधान आवताडे यांचे सामाजिक क्षेत्रासोबत शैक्षणिक क्षेत्रात देखील महत्वपूर्ण योगदान सी.एस.आर. फंडातुन दिला स्वेरीसाठी रु. २० लाखांचा निधी

                                                                                                            

आमदार समाधान आवताडे यांचे सामाजिक क्षेत्रासोबत शैक्षणिक क्षेत्रात देखील महत्वपूर्ण योगदान


सी.एस.आर. फंडातुन दिला स्वेरीसाठी रु. २० लाखांचा निधी  



पंढरपूर : शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग करून विद्यार्थ्यांना प्रगतीच्या वाटेवर नेवून सोडणाऱ्या स्वेरीचे नाव आता राज्याबरोबरच देशभरात झाले आहे, हे पाहून राज्याच्या राजकीय पटलावर विविध विषय हाताळताना नेहमी लक्षवेधी भूमिका मांडणारे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेचे सदस्य आमदार समाधान आवताडे यांनी स्वेरीतील शैक्षणिक उपक्रमांना  आणखी हातभार लावला आहे. आमदार आवताडे यांनी स्वेरीसाठी रु. २० लाखांचा निधी दिला असून यापैकी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’साठी रु. १६ लाख आणि एमबीए विभागासाठी रु. ४ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आमदार आवताडे हे सामाजिक, राजकीय क्षेत्राबरोबरच आता शैक्षणिक क्षेत्रात देखील महत्वपूर्ण योगदान देत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात अशा निधीच्या उपलब्धतेमुळे प्रगतीचा वेग अजून वाढणार आहे, हे निश्चित. 

       गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात ‘इलेक्ट्रिक व्हेईकल सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना करण्यात आली असून, या उपक्रमात श्री. एस. एम. आवताडे प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे उल्लेखनीय योगदान लाभले आहे. या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या स्थापनेसाठी आणि मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) विभागाच्या स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्स (एस.पी.एस.एस) सॉफ्टवेअर साठी श्री. एस. एम. आवताडे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून एकूण रु.२० लाखांचे आर्थिक सहाय्य मिळाले असून, हा उपक्रम समाजहितासाठी तांत्रिक शिक्षणात प्रत्यक्ष गुंतवणुकीचा आदर्श ठरतो. सामाजिक बांधिलकीतून शिक्षण क्षेत्रात हातभार लावत आमदार आवताडे यांनी विद्यार्थ्यांसाठी उच्चस्तरीय प्रयोग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उदघाटन माजी तंत्रशिक्षण संचालक डॉ. एन. बी. पासलकर व श्री एस. एम. आवताडे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक व उद्योजक संजय आवताडे यांच्या हस्ते झाले. या सेंटर ऑफ एक्सलन्समुळे आता विद्यार्थी थेट इलेक्ट्रिक वाहनांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रयोग करू शकणार आहेत. यासाठी या प्रयोगशाळेत लिथियम आयन सेल टेस्टिंग युनिट, लिथियम आयन बॅटरी पॅक टेस्टिंग युनिट, लिथियम आयन बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि इलेक्ट्रिक व्हेईकल ॲडव्हान्स पावरट्रेन बेंच ही चार अत्याधुनिक यंत्र आणण्यात आली असून यामध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, मोटर कंट्रोल, चार्जिंग यंत्रणा, इन्व्हर्टर ड्राइव्हर्स यासारख्या प्रणालींवर काम करताना विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य प्राप्त होणार आहेत, जे विद्यार्थ्यांना सतत बदलणाऱ्या उद्योगविश्वात सक्षमपणे उभे राहण्यासाठी उपयुक्त ठरतील. यासाठी बेंगळुरू मधील प्रसिध्द असलेल्या डेसिबल्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अत्याधुनिक मशीन्स बसविण्यासाठी तांत्रिक योगदान दिले आहे. या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या स्थापनेसाठी स्वेरीच्या प्रा. डी. डी. डफळे व प्रा.मंजीत कुमार या प्राध्यापकांना बेंगळुरूमध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्य डॉ. मिनाक्षी पवार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एम. पवार यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख डॉ. बादल कुमार, इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता डॉ. डी. ए. तंबोळी व प्रा. एस. एस. कवडे यांनी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’साठी परिश्रम घेतले. आमदार आवताडे यांचे हे सामाजिक योगदान शिक्षण क्षेत्रात निश्चितच प्रेरणादायी ठरून इतर उद्योजकांनाही अशाच सकारात्मक उपक्रमांसाठी प्रेरणा देणारे ठरणार आहे. सी.एस. आर. फंडातुन स्वेरीसाठी रु. २० लाखांचा निधी  दिल्याबद्धल संचालक व उद्योजक संजय आवताडे यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी  माजी शास्त्रज्ञ डॉ. व्ही.के. सुरी, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, विश्वस्त एच.एम. बागल, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, संशोधन अधिष्ठाता डॉ. ए.पी. केने व इतर प्राध्यापक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad