*कृतीयुक्त शिक्षणपद्धती मुलांसाठी अधिक प्रभावी- डाॅ. सोमनाथ ठिगळे*
*○फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये एकदिवसीय कार्यशाळा संपन्न*
सांगोला: प्रतिनिधी
कृतीयुक्त शिक्षण मुलांना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग वास्तविक जीवनात कसा करायचा हे शिकवते. मुलांना स्वतःच्या हाताने काहीतरी करण्याची संधी मिळाल्याने त्यांची सर्जनशीलता आणि जिज्ञासा वाढते. जेव्हा मुले काहीतरी नवीन शिकतात आणि ते यशस्वीरित्या करतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो. कृतीयुक्त शिक्षण मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करण्यास मदत करते, ज्यामुळे ते आयुष्यभर शिकत राहतात. कृतीयुक्त शिक्षणपद्धती मुलांसाठी अधिक प्रभावी, मजेदार आणि उपयुक्त असल्याचे मत डाॅ. सोमनाथ ठिगळे यांनी फॅबटेक पब्लिक स्कूल मधील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये शनिवार दिनांक १४ जून २०२५ रोजी लीड स्टेम डीएलडी या सेमिनार अंतर्गत अनुभवात्मक शिक्षण हा प्रमुख विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते डाॅ. सोमनाथ ठिगळे यांचे प्राचार्य सिकंदर पाटील यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यादरम्यान अनुभवात्मक शिक्षण हा प्रमुख विषयावर एस म्हणजे विज्ञान, टी म्हणजे तंत्रज्ञान, ई म्हणजे अभियांत्रिकी, एम म्हणजे गणित या संकल्पना स्पष्ट केल्या. यामध्ये शिक्षकाने स्वतः अनुभव घेऊन मुलांना शिकवावे जेणेकरून विद्यार्थी त्याचा जीवनात वापर करतील या शिक्षण पद्धतीमुळे मुलांची आकलन क्षमता वाढीस लागेल. विज्ञान, गणित विषयातील अवघड संकल्पना मुलांना चांगल्या प्रकारे आकलन होण्यासाठी विज्ञान गणित विषयातील मॉडेल्स ना घेऊन शिक्षकाने त्यावर कृतीयुक्त उपक्रम राबवल्यास विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. भविष्यात येऊ घातलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपले भविष्य चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी घडवावे यासाठी शिक्षकांनी मदत करावी यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. सांगोला फॅबटेक ज्युनिअर कॉलेज व सहोदय कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमानाने हि कार्यशाळा घेण्यात आली होती.
हि कार्यशाळा फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती
हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सुपरवायझर वनिता बाबर सह स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

