यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत तीन उद्योगाभिमुख कौशल्य विकास कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन
पंढरपूर | प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी दि. २८ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत तीन उद्योगाभिमुख कौशल्य विकास कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅडकॅमगुरू, पुणे यांच्या सहकार्याने कॅटिया (CATIA) व सॉलिडवर्क्स (SolidWorks) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यामध्ये संगणक साहाय्यित रचना (CAD), त्रिमितीय मॉडेलिंग, असेंब्ली, शीट मेटल डिझाईन व प्रॉडक्ट डिझाईन यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच कॅडकॅम्ब्रिज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या माध्यमातून जिओमेट्रिक डायमेन्शनिंग अँड टॉलरन्सिंग (GD&T) या विषयावरील प्रशिक्षणात GD&T संकल्पना, चिन्हे, डेटम्स, टॉलरन्सेस आणि गुणवत्ता नियंत्रणातील उपयोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. श्री. किरण पाठमासे यांनी संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, टीमवर्क, वेळेचे व्यवस्थापन, मुलाखत कौशल्ये व करिअर विकास या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण, संगणकाधारित डिझाईन आणि व्यावसायिक कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळून त्यांची उद्योगसज्जता व रोजगारक्षमता अधिक सक्षम झाली.
या उपक्रमांना यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले. विद्यार्थ्यांनी या कौशल्य विकास कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विभागाच्या उद्योगाभिमुख उपक्रमांचे स्वागत केले.

