पंढरपूर सिंहगड’चा प्लेसमेंटमध्ये पुन्हा एकदा दमदार ठसा!
९.७९ लाखांचे पॅकेज म्हणजे गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाची यशस्वी पावती!
पंढरपूर प्रतिनिधी- गणेश गांडुळे
भोसेरे (ता. माढा) येथील प्राजक्ता तानाजी बागल हिने आपल्या गुणवत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्राजक्ता तानाजी बागल ही कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाची विद्यार्थिनी असून, तिची पुणे येथील नामांकित कूपर लायटिंग सोल्यूशन या कंपनीमध्ये असिस्टंट डेव्हलपमेंट डिझाइन इंजिनीयर पदावर निवड झाली आहे. तिला कंपनीकडून वार्षिक ९.७९ लाख रुपयांचे आकर्षक पॅकेज मिळाले आहे. तिच्या या यशामुळे पंढरपूर सिंहगड कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कूपर लायटिंग सोल्यूशन ही प्रकाशयोजना आणि स्मार्ट लाइटिंग सोल्युशन्स क्षेत्रात कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनी आहे. ऊर्जा-कार्यक्षम प्रकाशयोजना, आधुनिक लाइटिंग तंत्रज्ञान आणि स्मार्ट लाइटिंग कंट्रोल्सच्या माध्यमातून कंपनी विविध औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रांसाठी नाविन्यपूर्ण सोल्युशन्स उपलब्ध करून देते. अशा प्रतिष्ठित कंपनीमध्ये प्राजक्ताची झालेली निवड ही तिच्या तांत्रिक ज्ञानाची, डिझाईन कौशल्याची आणि मेहनतीची उल्लेखनीय पावती मानली जात आहे.
अभियांत्रिकी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्राजक्ताने घेतलेले सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळे तिला हे यश मिळाले. महाविद्यालयातील उद्योगाभिमुख प्रशिक्षण, कौशल्य विकास उपक्रम आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या मार्गदर्शनाचा तिच्या यशात मोलाचा वाटा आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी प्राजक्ताचे अभिनंदन करून, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर आपल्या करिअरमध्ये मोठे यश संपादन करावे, असे आवाहन केले. प्राजक्ताची कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. समीर कटेकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार तयार करण्यासाठी महाविद्यालयात तांत्रिक कौशल्य, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला जात आहे. याच प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये सातत्याने निवड होत आहे.
प्राजक्ताच्या या यशाबद्दल उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडुरु, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अतुल कुलकर्णी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राजक्ता बागल हिचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

