वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स दिनानिमित्त एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जागतिक स्तरावर गौरव

 वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स दिनानिमित्त एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जागतिक स्तरावर गौरव



पंढरपूर : वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स दिन व झेप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर यांना "डिजिटल वेलबीइंग क्षेत्रातील चार वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल" प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबाबतची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे यांनी दिली.


गेल्या चार वर्षांपासून महाविद्यालय विद्यार्थी, शिक्षक व समाजामध्ये मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. डिजिटल डिटॉक्स अभियानांतर्गत जनजागृतीपर व्याख्याने, पथनाट्य, जनजागृती दिंडी, डिजिटल उपकरणांचा जबाबदारीने वापर, सोशल मीडियाचा मर्यादित वापर तसेच मानसिक आरोग्याविषयी जनजागृती असे विविध उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात आले. या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, हा पुरस्कार म्हणजे महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण कार्याची पोचपावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


पुरस्कार वितरण सोहळा झेप फाउंडेशन व वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स दिन यांच्या संस्थापिका डॉ. रेखा चौधरी, समन्वयक सौ. वैशाली चव्हाण, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमित इंगोले, प्रा. गुरुराज इनामदार, तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी व वारकरी यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


यावेळी डिजिटल डिटॉक्सचा संदेश देण्यासाठी जनजागृतीपर दिंडीचे आयोजन करण्यात आले. तसेच डिजिटल व्यसनमुक्ती व जबाबदार डिजिटल वापराबाबत प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. याचबरोबर डिजिटल उपकरणांचा संयमित व जबाबदारीने वापर करण्याची सामूहिक प्रतिज्ञा उपस्थित सर्वांनी घेतली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी राधिका निकम व वैभवी पवार यांनी केले.


या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच हितचिंतकांनी महाविद्यालयाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad