स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत तीन विद्यार्थी
पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या गुणवत्ता यादीत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग (यंत्र अभियांत्रिकी) च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. पु.अ. हो. सोलापूर विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी तीन मानांकने पटकावत महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.
विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील चंद्रशेखर संजय विजापुरे यांनी ९.८६ सीजीपीए (८६.९१टक्के) गुणांसह विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकाविला तसेच दिक्षा चंद्रकांत शिंदे यांनी ९.७७ सीजीपीए (८६.८७ टक्के) मिळवत विद्यापीठात तृतीय क्रमांक, तर मयूर रामचंद्र आसबे यांनी ९.६० सीजीपीए (८२.७४टक्के) मिळवत विद्यापीठात चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. अंतिम वर्ष बी.टेक. यंत्र अभियांत्रिकीच्या गुणवत्ता यादीत तीन विद्यार्थ्यांनी मानाचे स्थान पटकावून स्वेरीने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. या उल्लेखनीय यशामागे महाविद्यालयात प्रभावीपणे राबविण्यात येणाऱ्या 'पंढरपूर पॅटर्न इन प्रोफेशनल एज्युकेशन (ट्रीपल पीई)' ची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे विद्यार्थी आवर्जून सांगतात. ‘ट्रीपल पीई’ पद्धती अंतर्गत शिक्षकांचा विकास, गुणवत्तापूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध अभ्यासपद्धती आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास यांवर विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या अभ्यास पद्धतीमध्ये शंभर टक्के उपस्थिती, वेळेचे काटेकोर नियोजन, प्रत्येक लेक्चर नंतर त्याच दिवशी शिकविलेल्या विषयाची पुनरावृत्ती, स्वतःच्या हस्ताक्षरात सविस्तर नोट्स तयार करणे, सातत्याने लेखी सराव, प्रश्नसंचांचा नियमित अभ्यास, असाइनमेंटचे वेळेत पूर्ण करणे, अभ्यासासंबंधी शंका त्वरित निरसन आणि स्व-अभ्यासाची सवय यांचा प्रभावीपणे समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना अधिक भक्कम होऊन विषयावरील प्रभुत्व वाढले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इंग्रजी भाषेचे संभाषण व लेखन कौशल्य, शब्दसंपदा वृद्धी, व्यक्तिमत्त्व विकास विषयक पुस्तकांचे वाचन, प्रेरणादायी व्यक्तींच्या विचारांचे संकलन व अनुकरण, सादरीकरण कौशल्य, नेतृत्वगुण, संशोधन व नवोपक्रमांची आवड, औद्योगिक भेटी देवून त्याचा अभ्यास करणे, तज्ज्ञ व्याख्याने, व्यावसायिक नैतिकता, सामाजिक उत्तरदायित्व तसेच संघभावना विकसित करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. विभागातील प्राध्यापकांनी सूक्ष्म अध्यापन नियोजन, नियमित युनिट टेस्ट, सराव परीक्षा, प्रश्नपत्रिका विश्लेषण, वैयक्तिक शंका निरसन, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रगत अध्ययन सत्रे, प्रगतीशील विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन तसेच पालकांशी सातत्यपूर्ण संवाद यांद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचे प्रामाणिकपणे पालन करत स्वअनुशासन, कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, दैनंदिन पुनरावृत्ती, नियमित सराव आणि उत्कृष्टतेची जिद्द या बळावर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत मानाचे स्थान मिळविले. महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण, संशोधनाभिमुख संस्कृती, आधुनिक अध्यापन पद्धती, अनुभवी प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची चिकाटी, जिद्द व समर्पण हे यशाचे फलित असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आले. या यशामागे संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीची सातत्यपूर्ण धडपड आणि विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक धोरण यांचा मोठा वाटा आहे. संस्थेचे सचिव डॉ. सूरज रोंगे यांचे गतिमान नेतृत्व, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांचे प्रभावी शैक्षणिक नेतृत्व तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील उच्च शिक्षित प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना दिलेले गुणवत्तापूर्ण अध्यापन, नियमित शैक्षणिक मार्गदर्शन, प्रेरणादायी वातावरण आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन यामुळे हे यश संपादन करता आले. या यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सूरज रोंगे, संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, संस्थेअंतर्गत असलेल्या पाचही महाविद्यालयांचे प्राचार्य, अभियांत्रिकी पदवीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

