पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी* *चिखल व पाणी साचू नये यासाठी मुरमीकरण; दर्शन रांगेत पाणी, जेवण व आरोग्य सुविधा सुरळीतपणे देण्याचे निर्देश*


*पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी*  


*चिखल व पाणी साचू नये यासाठी मुरमीकरण; दर्शन रांगेत पाणी, जेवण व आरोग्य सुविधा सुरळीतपणे देण्याचे निर्देश*  



*पंढरपूर, दि. २१:* आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज वाखरी पालखी तळ, पत्राशेड दर्शन रांग, वाळवंट व भक्ती सागर येथे वारकरी व भाविकांसाठी प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.


*वाखरीत मुरमीकरण व पाईपची व्यवस्था*  

      दिनांक १८ जुलै रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाऊस सुरू असताना वाखरी पालखी तळाची पाहणी केली होती, येथे पावसामुळे चिखल झाला होता. त्या ठिकाणी तात्काळ मुरमीकरण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुरमीकरणाचे काम सुरू आहे. तसेच पाणी साचू नये म्हणून पाईप टाकण्यात आले आहेत. या कामाची पालकमंत्री गोरे यांनी पाहणी केली. या ठिकाणी अजिबात चिखल व पाणी साचणार नाही, या दृष्टीने काम झाले पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.  


*दर्शन रांगेतील सुविधांवर भर*  

दर्शन रांगेत भाविकांना त्रास होणार नाही यासाठी पाण्याची पुरेशी सोय करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे मोफत जेवण योग्य पद्धतीने व प्रत्येक भाविकाला मिळेल अशा पद्धतीने वाटप करावे, असे त्यांनी सांगितले.  


*आरोग्य व वीज पुरवठ्याबाबत सूचना*  

ठिकठिकाणी नियुक्त केलेल्या आरोग्य पथकामध्ये औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. या भागात रात्रीच्या वेळी वीज जाणार नाही, यासाठी वीज वितरण कंपनीशी समन्वय ठेवून काम करण्यास सांगितले.  


*स्वच्छतेवर विशेष लक्ष*  

या सर्व ठिकाणी स्वच्छतेला महत्त्व असून पंढरपूर नगरपरिषद, मंदिर समिती तसेच अतिरिक्त नियुक्त करण्यात आलेले सफाई कर्मचारी यांनी वेळोवेळी तात्काळ हा सर्व भाग स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले. तसेच वाखरी पालखीतळ भक्ती सागर वाळवंट व दर्शन रांगेत ज्या ज्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा पुरेसे सफाई मनुष्यबळ तसेच सक्शन मशीन आदि ची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करून शौचालय नियमितपणे स्वच्छ राहतील या दृष्टीने नियुक्त केलेल्या सुपरवायझरने काटेकोरपणे काम करावे, असेही पालकमंत्री श्री. गोरे यांनी निर्देशित केले.


यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी पालखी तळ भक्ती सागर (65 एकर), रिद्धी सिद्धी दर्शन मंडप,दर्शन रांग येथील पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, मुख्याधिकारी महेश रोकडे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  

                ******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad