*पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा डंका; सानिकाला ९ लाखांचे पॅकेज*
पंढरपूर : प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी सानिका पोपट चव्हाण हिने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अमेरिकास्थित नामांकित ‘इव्होलेंट’ या हेल्थकेअर टेक्नॉलॉजी कंपनीत असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी तिची निवड झाली असून, तिला वार्षिक ९ लाख रुपयांचे आकर्षक पॅकेज मिळाले आहे. सानिका ८ जून २०२६ रोजी पुणे येथे कंपनीत रुजू झाली आहे.
सानिका चव्हाण हिच्या या यशामुळे पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाच्या प्लेसमेंटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची महाविद्यालयाची यशस्वी परंपरा या निवडीमुळे अधोरेखित झाली आहे.
अमेरिकास्थित ‘इव्होलेंट’ ही हेल्थकेअर टेक्नॉलॉजी आणि हेल्थ सर्व्हिसेस क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून, रुग्णालये, आरोग्य विमा कंपन्या आणि हेल्थकेअर संस्थांसाठी तंत्रज्ञान, डेटा अॅनालिटिक्स, क्लेम प्रोसेसिंग आणि आरोग्य व्यवस्थापनाशी संबंधित सेवा पुरवते. अशा जागतिक स्तरावरील कंपनीत सानिकाची झालेली निवड ही तिच्या तांत्रिक कौशल्याची आणि गुणवत्तेची पावती मानली जात आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण आणि आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यावर विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तांत्रिक प्रशिक्षण, कोडिंग प्रॅक्टिस, ॲप्टिट्यूड ट्रेनिंग, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, इंडस्ट्री एक्स्पर्ट सेशन्स, करिअर गाईडन्स आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा यांसारखे विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. परिणामी, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून ते नामांकित कंपन्यांच्या निवड प्रक्रियेत यशस्वी होत आहेत.
"गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख कौशल्यविकास आणि सातत्यपूर्ण प्लेसमेंट प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे हे महाविद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे," अशी माहिती प्राचार्य डॉ. कैलास करांडे यांनी दिली.
सानिका चव्हाण हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य डॉ. कैलास करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांच्यासह डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. संदीप लिंगे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

