आषाढी यात्रेनंतर पंढरपूरमध्ये महास्वच्छता मोहीम; नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके यांचा प्रत्यक्ष उत्स्फूर्त सहभाग


आषाढी यात्रेनंतर पंढरपूरमध्ये महास्वच्छता मोहीम; नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके यांचा प्रत्यक्ष उत्स्फूर्त  सहभाग



पंढरपूर | प्रतिनिधी


आषाढी एकादशी यात्रेचा सोहळा यंदाही अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. लाखो वारकऱ्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर पंढरपूर शहर पुन्हा स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने विशेष महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली.


या मोहिमेत नगराध्यक्षा सौ. डॉ. प्रणिताताई भागीरथ भालके यांनी स्वतः उपस्थित राहून स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांनी विविध भागांची पाहणी करत स्वच्छता कामांचा आढावा घेतला तसेच कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकानेही आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


यात्रेनंतर शहरातील ६५ एकर परिसर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा घाट, प्रमुख रस्ते, बसस्थानक परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली. साचलेला कचरा, निर्माल्य आणि इतर घनकचरा तातडीने हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. यासाठी नगरपालिका प्रशासन, स्वच्छता विभाग आणि स्वच्छता कर्मचारी यांनी दिवसरात्र मेहनत घेतली.


यात्रेदरम्यान शहरात लाखो भाविकांची वर्दळ असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. मात्र यात्रा संपताच अल्पावधीत शहर पूर्ववत स्वच्छ करण्याचे मोठे आव्हान नगरपालिका प्रशासनाने यशस्वीपणे पेलले. या मोहिमेमुळे भाविकांसह नागरिकांमध्येही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके यांनी सांगितले की, "स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर" हा केवळ संकल्प नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग असलेली लोकचळवळ आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. नागरिकांनीही कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता योग्य ठिकाणीच टाकावा आणि स्वच्छतेच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


आषाढी यात्रेनंतर राबविण्यात आलेल्या या महास्वच्छता मोहिमेमुळे पंढरपूर शहर पुन्हा एकदा स्वच्छ, नीटनेटके आणि भाविकांसाठी आकर्षक स्वरूपात दिसून येत असून, नगरपालिका प्रशासनाच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad