मातृभाषेचा सन्मान हे आपले आद्य कर्तव्य
-डॉ.यशपाल खेडकर
स्वेरीमध्ये ‘मातृभाषा दिन’ साजरा
पंढरपूर- ‘मराठी भाषा ही केवळ संवाद साधण्याचे साधन नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक जीवनाचा तो एक महत्वाचा भाग आहे. सध्या सर्वत्र इंग्रजी भाषेचे लोण पसरले असले तरी जागतिक पातळीवर ती ज्ञानभाषा आहे. मात्र आपल्या प्रेम, भावना, आनंद, दुखः, प्रसन्नता, निराशा, विश्वास या भावना व्यक्त करायच्या असल्यास मातृभाषेद्वारे त्या अधिक प्रभावीपणे प्रकट करता येतात म्हणून मातृभाषेचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.’ असे प्रतिपादन प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी केले.
केंद्रीय मंत्रालयाच्या ‘मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन’ यांच्या आदेशाने व ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांच्या सूचनेनुसार ‘मातृभाषेच्या माध्यमातून बुद्धिमत्ता आणि क्षमता विकास’ अंतर्गत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीच्या भव्य मैदानावरील हिरवळीवर ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.यशपाल खेडकर हे मातृभाषा दिनाचे महत्व विशद करत होते. डॉ. खेडकर पुढे म्हणाले की, ‘युनो ने जागतिक मातृभाषा दिन का साजरा करावा याबाबत स्पष्ट केले असून तंत्रज्ञान युगातून भौगोलिक दरी कमी होत आहे. विविध ठिकाणी शिक्षण घेतलेली विविध संस्कृतीतील माणसे कामानिमित्त एकत्र येतात तेव्हा संवादासाठी ज्ञानभाषा म्हणुन इंग्रजी वापरली जाते परंतु आपल्या प्रांतातून आपल्या माणसांशी ज्या भाषेतून आपण बोलतो तिला मातृभाषा म्हणतात. कोसावर बोलीभाषा बदलते, विविध देश, विविध राज्य, विविध प्रांतामध्ये डोकावल्यास त्या भागातील कोणते लोक कशी भाषा वापरतात यावरून त्यांची मातृभाषा ओळखता येते. यासाठी बहुभाषांना प्रोत्साहन देण्यासाठी मातृभाषा दिन साजरे करतात.’ असे सांगून त्यांनी मातृभाषेसंदर्भात अनेक उदाहरणे दिली. यावेळी अभियंता योगगुरू अशोक ननवरे, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस. मठपती, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांतील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते. डॉ. नीता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.