स्वेरी फार्मसीच्या संशोधन प्रकल्पाला पाच लाखांचा निधी मंजूर
पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन (आर.जी.एस.टी.सी.) कडून स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीला ‘डेव्हलपमेंट ऑफ टॉपिकल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम फॉर ट्रीटमेंट ऑफ सोरायसिस’ या विषयावरील संशोधन प्रकल्पाला पाच लाख रुपयांचा संशोधन निधी मंजूर झाला आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी. पी. रोंगे यांनी दिली.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी अंतर्गत असलेल्या ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ अर्थात संशोधन विभागामार्फत मुख्य संशोधक डॉ. वृणाल विश्वासराव मोरे व सहाय्यक संशोधक प्रा.प्रदीप अविनाश जाधव यांनी ‘डेव्हलपमेंट ऑफ टॉपिकल ट्रक डिलिव्हरी सिस्टीम फॉर ट्रीटमेंट ऑफ सोरायसिस’ या विषयावर आपले संशोधन प्रस्ताव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनकडे सादर केले होते. सदर प्रस्तावाला राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनच्या पियर रिव्ह्यू कमिटीकडून शिफारस मिळाली असून त्यांना सोलापूर विद्यापीठाने देखील मान्यता दिलेली आहे. सदर संशोधन प्रकल्प हा ‘सोरायसिस’ या गंभीर त्वचा रोगावर ‘नोव्हेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम’च्या सहाय्याने ‘फॉर्म्युलाशन डेव्हलपमेंट’ या संकल्पावर आधारित आहे ज्यामध्ये विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट दराने औषध सोडण्याची समस्या दूर करण्यासाठी ‘नॅनो पार्टिकल्स’चा वापर करून त्याद्वारे रुग्णांना औषध वितरण करण्यात येते. या पद्धतीचा वापर केल्यामुळे कन्व्हेन्शनल (पारंपरिक) ड्रग डिलिव्हरीमुळे होणारे नुकसान व औषधाच्या अति वापराने होणारे दुष्परिणाम टाळता येणे आता शक्य होणार आहे. ‘सोरायसिस हा एक त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज सुटते त्यामुळे त्वचेवर खवले युक्त ठिपके तयार होतात. याच्या व्यवस्थापन व उपचारासाठी या संशोधनाचा फायदा होणार आहे. संशोधन निधी मिळाल्यामुळे डॉ.वृणाल मोरे व प्रा.प्रदीप जाधव यांचे प्राचार्य डॉ.एम.जी मणियार, संस्थेचे सचिव डॉ.बी.पी रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.