राष्ट्रीय सेवा योजनेतून उद्याचे जबाबदार नागरिक बनतात
-प्राचार्य डॉ. एन. बी. पवार
स्वेरी अभियांत्रिकीच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचा अजनसोंडमध्ये समारोप
पंढरपूर- ‘एन.एस.एस. ही विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय चांगली संधी असते. एन.एस.एस.च्या माध्यमातून तंत्रशिक्षण घेणारे विद्यार्थी देखील ग्रामीण भागाशी एकरूप होऊ शकतात, येथील नागरिकांचे प्रश्न समजून घेऊ शकतात व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम करू शकतात. एकंदरीत उद्याच्या भारताचे जबाबदार नागरिक हे या एन.एस.एस. च्या माध्यमातून निर्माण होतात.’ असे प्रतिपादन कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेंजमेंट स्टडीजचे प्राचार्य डॉ. एन. बी. पवार यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या संयुक्त विद्यमाने अजनसोंड (ता. पंढरपूर) मध्ये दि ०९ फेब्रुवारी ते दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत या कालावधीत राष्ट्रीय सेवायोजने अंतर्गत ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. एन. बी. पवार हे मार्गदर्शन करत होते. यावेळी उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार म्हणाल्या की, ‘एन.एस.एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. तंत्रज्ञानातून मिळालेले ज्ञान हे ग्रामीण भागाच्या विकासासाठी विद्यार्थी वापरू शकतात आणि त्यातून देशाची प्रगती होऊ शकते.’ अजनसोंड मधील नागरिक तुकाराम डुबल म्हणाले की, ‘स्वेरीच्या एन.एस.एस. मधील विद्यार्थ्यांनी आठवडाभर मनापासून परिश्रम घेवून शिक्षण, आरोग्य, ग्रामस्वच्छता, वृक्षलागवड पाणी व वीज बचतीचे महत्व अशा विविध उपक्रमांची जनजागृती करून अतिशय चांगले व इतरांना अनुकरणीय असे काम केले आहे. झाडे लावणे, स्वच्छता करणे, झाडांना अळी करून पाणी देणे, गावामध्ये रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करणे, पथनाट्य, शाळांमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धा आधी गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडल्या आहेत. स्वेरीच्या विद्यार्थ्यांमध्ये एक अनोखी शिस्त आहे ज्यामुळे त्यांनी केलेले काम हे नेहमीच उत्तम होते.’ यावेळी अजनसोंड ग्रामस्थांच्या वतीने उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस. मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि एन.एस.एस.चे विद्यार्थी प्रतिनिधी व सर्व स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात आला. तसेच निबंध व चित्रकला स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शांताप्रभू प्रशाला अजनसोंड या शाळेतील विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अजनसोंड मधील सरपंच रामचंद्र घाडगे, उपसरपंच बाळासो कांबळे, ग्रामसेवक सौ. सविता हंजगीकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, शांताप्रभू प्रशालेतील शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश खडतरे, सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी लोंढे यांनी केले तर यश शेळके यांनी आभार मानले.