आय.सी.एम.एस.च्या रा. से. यो.च्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे एकलासपूर मध्ये उदघाटन
पंढरपूर– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रसिव्ह एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने एकलासपूर (ता. पंढरपूर) मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.
प्रारंभी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ. अश्विनी ताड यांच्या हस्ते करून ‘युथ फॉर माय भारत’ व ‘डिजिटल साक्षरतेसाठी युवक’ या स्लोगन खाली या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे उदघाटन करण्यात आले. या उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे हे होते. रा.से.यो.चे विद्यार्थी प्रतिनिधी मनोज माळी यांनी प्रास्ताविकात दि.२२ फेब्रुवारी पासून ते दि.२८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आठवडाभर चालणाऱ्या या ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या शिबिराची संपूर्ण रूपरेषा व यासंबंधी सविस्तर माहिती दिली. यावेळी नूतन सरपंच श्री. दत्ता ताड यांनी महाविद्यालयाने ग्रामपंचायत एकलासपूर या गावाची विशेष श्रमसंस्कार शिबिरासाठी निवड केल्याबद्दल आभारी आहे असे त्यांच्या भाषणातून सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेचे पंढरपूर विभागीय समन्वयक डॉ. संजय मुजमुले म्हणाले की, ‘एन.एस.एस. हे विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय मोलाचे व्यासपीठ असून या आठवडाभर चालणार्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गावातील समस्या जाणून घेऊन त्या समस्यांशी एकरूप होणे आवश्यक आहे तसेच या समस्या आपल्या कार्यातून कशा सोडवता येतील या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे व आपण विशेष श्रमसंस्कार शिबिराची सुरुवात ही संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून करत आहोत ही एक अभिमानाची बाब आहे' असे विचार त्यांनी व्यक्त केले. संस्थेचे सचिव डॉ. बी.पी. रोंगे म्हणाले की, ‘स्वाईप (श्री.विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रसिव्ह एज्युकेशन) अथवा आय.सी.एम.एस. (इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज) हा स्वेरी परिवाराचाच एक भाग आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन ते प्रश्न समूळ सोडवण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शिबिरा दरम्यान कार्यशील राहून समाजसेवेची संधी घेतली पाहिजे.’ तसेच या शिबिरा दरम्यान त्यांनी आमचे विद्यार्थी हे गावांमधील सर्व परिसर स्वच्छता करून गावातील विविध उपक्रमातून गावाची जनजागृती करतील असा शब्द ग्रामस्थांना त्यावेळी दिला. यावेळी एकलासपूरचे उपसरपंच हणमंत महादेव ताड, पोलीस पाटील अविनाश कुरे, ग्रामसेवक सुहास शिंदे, सरपंच अश्विनी ताड, उपसरपंच हणमंत ताड, प्रतिष्ठित नागरिक, ग्रा.पं.सदस्य व कॅम्पस प्रमुख डॉ. जयश्री भोसले, तसेच एकलासपूर मधील ग्रामस्थ उपस्थित होते. आठवडाभर चालणाऱ्या या शिबिरात आय.सी.एम.एस.च्या राष्ट्रीय सेवा योजनेतील सुमारे ४९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे हे शिबीर व्यवस्थित पार पाडण्यासाठी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.एम.व्ही.चौगुले, प्रा.कांचन नलवडे, प्रा.भाग्यश्री देशचौगुले, प्रा.शामल इंगवले, प्रा.अश्विनी सुरवसे, प्रा.निलेश इंगळे, प्रा. राजश्री भंडारी, प्रा.उमा नागणे, प्रा.आम्रपाली खंडागळे यांच्या सह विद्यार्थी स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. रुचिता पेंडलवार आणि आर्या भोसले यांनी सुत्रसंचालन केले तर रुचिता पेंडलवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.