विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक सर्व पूर्व तयारीच्या कामांना गती द्यावी
- निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे
पंढरपूर दि.01:- विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता करावी, निर्धारित कामे वेळेत पूर्ण करून सोपवलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात. तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व पूर्व तयारीच्या कामांना गती द्यावी अशा सूचना 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सास्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे निवडणूक नियुक्त नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन लंगुटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव, गटविकास अधिकारी सुशील संसारे, गटविकास अधिकारी योगेश कदम, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, मुख्याधिकारी चरण कोल्हे, पोलीस निरिक्षक विश्वजित घोडके,निवडणूक नायब तहसीलदार वैभव बुचके, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड, विजय जाधव, निवडणूक विभागाचे राजेश सावळे, राजेंद्र शिंदे तसेच नोडल अधिकारी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणूक कालावधीमध्ये कामकाज करण्यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्या आहे. यामध्ये मुख्य नियंत्रण कक्ष, वाहतूक व्यवस्थापन, आदर्श आचार संहिता, बॅलेट पेपर आणि पोस्टल बॅलेट पेपर व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, प्रसार माध्यम आणि संदेशवहन, निवडणूक निरीक्षक, प्रशिक्षण आणि जनजागृती, मतदान केंद्र, मतदान केंद्रावरील किमान मूलभूत सुविधा, दिव्यांग मतदार, स्वीप मोहीम शहरी व ग्रामीण भाग या निवडणूक विषयक कामकाजासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. नियुक्त नोडल अधिकाऱ्यांना सोपवलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात तसेच याबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वेळोवेळी केलेल्या कामकाजाचा आढावा घ्यावा.ज्या मतदान केंद्रावर 5 टक्केपेक्षा कमी मतदान झाले आहे अशा ठिकाणी मतदार जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याची खात्री करा. शांततापूर्ण निवडणुकांसाठी सुरक्षा योजना तयार करा. पोस्टल मतदानासाठी पात्र व्यक्तींना पोस्टल मतदानाबाबतची माहिती मुदतीत देण्यात यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी.फ्लाइंग स्क्वॉड आणि एसएसटीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. निवडणूक संबंधित तक्रारींसाठी तयार करण्यात आलेल्या सी-व्हिजिल मोबाईल अॅपवर लक्ष ठेवावे. तात्काळ निराकरण करावे, अशा सूचनाही निवडणूक निर्णय अधिकारी इथापे यांनी यावेळी दिल्या.
000000