धनगर आरक्षण पेटले, दिलीप मानेंनी पंढरपुरात घेतली उपोषणाकर्त्यांची भेट*

 *धनगर आरक्षण पेटले, दिलीप मानेंनी पंढरपुरात घेतली उपोषणाकर्त्यांची भेट* 



सोलापूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामधून आरक्षण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे राज्यस्तरीय उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या विविध सामाजिक राजकीय नेत्यांकडून पाठिंबा दर्शवला जात आहे. त्याचप्रमाणे सोलापूर दक्षिण मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी देखील रविवारी उपोषणस्थळी आंदोलकांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे.



आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेले धनगर समाजाच्या उपोषण आंदोलनाला सात दिवस होत आले मात्र सरकारकडून अद्यापही यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. तसेच समाजातील विविध स्तरातून धनगर समाजाच्या आंदोलनास पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी देखील रविवारी पंढरपुरातील धनगर समाजाच्या उपोषण आंदोलन स्थळी उपस्थिती लावली.


या प्रसंगी बोलताना दिलीप माने म्हणाले की, धनगर समाजाला मागच्या अनेक वर्षांपासून आश्वासनावर आश्वासने दिली जात आहेत. पण भाजप सरकारकडून ठोस पाऊल उचलले जात नाहीत. तसेच धनगर समाजाचा सत्ताधाऱ्यांनी राजकीय तसेच सामाजिक फायदा घेतला. पण या समाज बांधवाना न्याय दिला नाही. त्यामुळे सर्वच स्तरावर या समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी नाईलाजास्तव धनगर समाज बांधवांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. असल्याचे मत माने यांनी व्यक्त केले.


मागील ७ दिवसांपासून धनगर बांधव उपोषण करत आहेत. त्यांच्या भेटीसाठी सत्ताधारी येत आहेत. पण त्यांनी अद्याप आपली कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. फक्त आश्वासन देण्याचे काम सुरू आहे. मात्र आता धनगर समाजाने आपल्या न्याय मागण्यासाठी लढा सुरु केला आहे. त्या लढ्यात मी आणि माझे उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहकारी आपल्या पाठीशी आहोत. आपल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी याठिकाणी आलो असल्याचे देखील माने यांनी नमूद केले. 


दरम्यान, धनगर समाजाचा अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश करा या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन केली जात आहेत. मात्र सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात असल्यामुळे धनगर समाजाचा आक्रमक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे राज्यस्तरीय उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे माढा तालुक्यातील आलेगाव येथील सरपंच अमोल देवकते यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर धनगर समाज अधिकच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. 



*सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे आंदोलन*


आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाला आहे. आज सोलापुरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या घरासमोर आंदोलकांनी ढोल वाजवून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. हे सरकार समाजा समाजात दुजाभाव करित आहे. तसेच झोपेच सोंग घेत आहे, असा आरोप यावेळी धनगर समाजातील आंदोलकांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad