*सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज केगाव सोलापूर येथे सीबीएसई क्लस्टर नवव्या बास्केटबॉल स्पर्धेचे जंगी उद्घाटन*
सोलापूर प्रतिनिधी
दि.14 सप्टेंबर 2024 : सोलापूर केगाव येथील सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे सीबीएसई क्लस्टर नवव्या बास्केटबॉल स्पर्धा 2024-25 चे आयोजन दिनांक 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत केलेले असून त्याचे दिनांक 13 सप्टेंबर रोजी जंगी उद्घाटन झाले. सिंहगड इन्स्टिट्यूटच्या असलेल्या भौतिक सुविधा व उत्तम क्रीडांगण याची पाहणी करून सीबीएसई ने या स्पर्धेचे आयोजन पद सिंहगड पब्लिक स्कूल ला दिलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण तीन विभागात संघ सहभागी झालेले आहेत (U-14, U-17 & U-19). सिंहगड पब्लिक स्कूलच्या भव्य प्रांगणात हा भव्य-दिव्य सोहळा पार पडला. महाराष्ट्र, गोवा आणि दिव-दमण येथून साधारण 120 संघ त्यामध्ये मुलींचे जवळपास 44 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण 1400 स्पर्धक या सोहळ्यास उपस्थित होते. पुणे प्रादेशिक विभागातूनही यावेळी अनेक स्पर्धक संघ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या आगमनानंतर सीबीएसई ध्वजाचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिंहगड संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर मा. संजय नवले यांच्या हस्ते झाले. यानंतर सर्व संघांचे संचालन करण्यात आले. क्रीडाजोत प्रज्वलित करून सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी त्याचे प्रांगणात प्रदर्शन केले. यानंतर सर्व संघांनी व स्पर्धकांनी क्रीडाशपथ घेतली. कार्यक्रमाची खरी रंगत महाराष्ट्राच्या ठसकेबाज लावणीने आणली. उद्घाटनाच्या सोपस्करानंतर महाराष्ट्राच्या लावणीने सर्वांनाच मंत्रमुग्ध करून अचंबित केले. यासोबतच आपली संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक 'विठुरायाची वारी' या नृत्याने सर्वांना भारावून टाकले. या दोन्ही नृत्य प्रकारानंतर फ्युजन डान्सने सुद्धा स्पर्धकांना एक अनोखी अनुभूती दिली. यापूर्वी अशा पद्धतीने एखाद्या सीबीएसई कार्यक्रमाची उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली नसल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. सोलापुरातील हा उद्घाटन सोहळा सर्व संघांना अचंबित करणारा ठरला. सिंहगड नेहमीच काही वेगळे देण्याचा प्रयत्न करीत असल्याची प्रचिती आल्याचा अनुभव उपस्थितानी व्यक्त केला. सीबीएसई निरीक्षक स्मिता बर्फे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सिंहगड संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर माननीय संजय नवले सर, सीबीएसई निरीक्षक स्मिता बर्फे, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू आरती सिंग, एन.बी. नवले, इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांची प्रमुख उपस्थिती होती. हा उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी सिंहगड पब्लिक स्कूल आणि जूनियर कॉलेजचे प्राचार्य निखत शेख व उपप्राचार्य प्रकाश नवले आणि सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी श्रम घेतले.