दयानंद कॉलेज, सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार ड्रोन तंत्रज्ञान संशोधनाला मिळणार गती


दयानंद कॉलेज, सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार

ड्रोन तंत्रज्ञान संशोधनाला मिळणार गती



पंढरपूर- ‘सोलापूर मधील डी.बी.एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार स्थापित झाला आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली. 

        ‘तांत्रिक शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढवणे’ हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः व्ही.जे.टी.आय., मुंबई, आय. आय.टी., बॉम्बे आणि स्वेरी, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ड्रोन प्रकल्पाशी संबंधित कार्यात दयानंद कॉलेजच्या भूगोल विभागाचा समावेश करणे हे या कराराचे आणखी एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर समाजोपयोगी उपक्रमांसाठी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प नव्या शक्यता तपासण्यावर लक्ष केंद्रीत करतो. या करारांतर्गत, डी.बी.एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या दोन्ही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. यामध्ये ड्रोन्सचा वापर, उच्च-रेझोल्युशन स्पेशल डेटाचे संकलन, सर्वेक्षण आणि मॅपिंग यांचा समावेश असेल. यामुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य विकसित होण्यास मदत होईल आणि त्यांच्या रोजगार क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या ड्रोन प्रकल्पाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे कसा करता येईल, याचा अभ्यास देखील केला जाईल. या करारानुसार, दोन्ही संस्था एकमेकांचे संसाधन विभागून घेतील, ज्यामध्ये ड्रोन्स, सॉफ्टवेअर आणि तांत्रिक कौशल्यांचा समावेश असणार आहे. या एकमेकांच्या सहकार्याच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुनिश्चित होईल तसेच संशोधनाच्या नवीन शक्यता निर्माण होतील. संयुक्त संशोधन प्रकल्पांतर्गत दोन्ही संस्था ड्रोन्सच्या वापरासंबंधित संशोधन करतील तसेच सर्वेक्षण तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक, पर्यावरणीय आणि संरचनात्मक प्रकल्पांसाठी सर्वेक्षणे करतील, ज्यामुळे शहरी नियोजन, पर्यावरणीय निगराणी आणि संसाधन व्यवस्थापन या क्षेत्रांत नवकल्पनांचा विकास होईल. हा सामंजस्य करार करण्यासाठी दयानंद ट्रस्टचे सचिव महेश चोप्रा, प्राचार्य डॉ. व्ही. पी. उबाळे, प्राचार्य डॉ.बी. एच. दामजी, प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. विरभद्र दंडे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी या कराराचे महत्त्व आणि भविष्यातील सहकार्याबाबत आपले विचार मांडले. विशेषतः आय.आय.टी., बॉम्बेच्या सहभागाने होणाऱ्या समाजोपयोगी ड्रोन प्रकल्पामध्ये दयानंद कॉलेजच्या भूगोल विभागाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad