राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांची मागणी
सदर मागणीचे आ आवताडे यांनी महसूल मंत्री ना.विखे- पाटील यांना दिले पत्र
प्रतिनिधी-राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे महसूल मंत्री मा.ना.राधाकृष्ण जी विखे-पाटील यांची मंत्रालयीन दालनात भेट घेऊन सदर मागणीचे त्यांना पत्र दिले आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोतवाल ही शासकीय कामास बांधील राहून कर्तव्य व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. राज्यातील लोकसंख्या ठिकाणी कोतवाल हे सजा मुख्यालय सोडून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी वर्ग ३ व वर्ग ४ या पदावरील कर्मचाऱ्यांची कामे वरिष्ठांच्या लेखी व तोंडी आदेशानुसार करत आहेत. कोतवाल हे पद महसूल विभागातील गाव पातळीवर शेवटचे महत्त्वाचे पद आहे. निवडणुका व विविध शासकीय योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
गाव पातळीवरील विविध शासकीय व निम-शासकीय कर्तव्याशी बांधील राहून लोककेंद्रीत विविध योजनांच्या विस्तारासाठी कोतवाल हा महत्वपूर्ण समन्वयक समजला जातो. कोतवाल बांधवांच्या भविष्यसाध्य बाबींचा विचार करून त्यांना या पदावर नेमणूक द्यावी अशी मागणी यावेळी आमदार आवताडे यांनी सदर पत्रामध्ये नमूद केली आहे.
सदरप्रसंगी जेष्ठ पत्रकार अबुक सुतार तसेच संबंधित प्रशासकीय विभागातील अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.