मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दोन्ही तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची आमदार आवताडे यांनी घेतली आढावा बैठक

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दोन्ही तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची आमदार आवताडे यांनी घेतली आढावा बैठक



प्रतिनिधी- केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या लोककल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार करणे तसेच पात्र लाभार्थी जनतेला त्या योजनांची आवश्यक माहिती प्राप्त होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अभियान निर्माण करा अशा सूचना मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व विभागांच्या प्रशासकीय अधिकारी तसेच पदाधिकारी यांना दिल्या आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पंढरपूर शहर मधून १८ हजार ३२३ एवढ्या महिलांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १७ हजार २९१ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत तर ९९अर्ज काही त्रुटी अभावी  बाकी आहेत. मतदारसंघातील २२ गावातून या योजनेसाठी २७ हजार ७७८ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २७ हजार ६७२ अर्ज मंजूर झाले आहेत तर उर्वरित १०६ अर्ज सुद्धा त्रुटी दुरुस्तीनंतर मंजूर केले जाणार आहेत. मंगळवेढा तालुक्यातील एकूण ५१ हजार ५२५ महिलांचे या योजनेसाठी अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ४९ हजार ९०६  पात्र महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत व १ हजार ९१६ महिलांचे काही त्रुटी अभावी अर्ज बाकी आहेत परंतु त्या त्रुटी दूर करून तेही अर्ज लवकरच मंजूर करण्यात येतील.  


राज्यातील महिला भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण असणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेमध्ये समाविष्ट न झालेल्या तसेच अर्ज करून पात्र ठरले आहेत परंतु पैसे जमा झाले नाहीत अशा विविध मुद्द्यांवर आमदार आवताडे यांनी मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या सभागृहात दोन्ही तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक बोलावली होती त्यावेळी ते बोलत होते. पंढरपूर व मंगळवेढा शहर तसेच तालुक्यातील जास्तीत-जास्त महिला भगिनींना या योजनेचा लाभ होण्यासाठी या अभियानामध्ये पात्र महिलांना बहुसंख्येने सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. संपूर्ण राज्यामध्ये सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची आपल्या मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त संख्या होऊन आपण टॉप मोस्ट राहिलो पाहिजे यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सुकन्या योजना, लाडकी लेक योजना,  वयोश्री योजना या व इतर योजनांची माहिती सामान्य जनतेला होण्यासाठी विविध जनजागृती पर कार्यक्रम राबवण्याचेही त्यांनी यावेळी सूचित केले.


त्याचबरोबर या योजनेअंतर्गत मदत मिळालेल्या अनेक महिला-भगिनींचे पहिल्या दोन हप्त्याचे पैसे काही राष्ट्रीयकृत बँकांनी थकबाकी व इतर कारणास्तव कापून घेतली आहेत. अशा बँकांनी त्या महिला भगिनींची शासनाच्या नियमावलीनुसार सदर रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करून त्यांना त्या रकमेचा लाभ मिळू देण्यासाठी अशाप्रकारे कोणतीही कार्यवाही करू नये अन्यथा आपण शांत बसणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम ही शासनाची मदत असल्यामुळे या मदतीवर कोणत्याही प्रकारे आपण नियमांची खिरापत चालवू नये त्यांना त्यांच्या लाभाची रक्कम मिळवून द्यावी असे त्यांनी यावेळी निर्देशित केले आहे. व शासनाकडून मिळणाऱ्या या सर्व योजनांची माहिती आणि लाभ जनतेला मिळावा यासाठी येत्या आठ दिवसात नियोजित जागोजागी संबंधित योजनाचे कॅम्प लावून या अभियानाला अधिक व्यापक रूप देण्याचा मनोदय आमदार अवताडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


सदर वेळी बँक ऑफ इंडिया,  बँक ऑफ महाराष्ट्र तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक शहर व ग्रामीण भागातील अधिकारी आणि पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 या कार्यक्रमासाठी दोन्ही तालुक्यातील प्रांताधिकारी तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जिल्हा सदस्य वर्षा शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख पै.अशोक चौंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जगन्नाथ रेवे, नाथा काशीद माजी उपसभापती सूर्यकांत ढोणे, राजू पुजारी तसेच इतर मान्यवर आणि सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी बँका अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad