निरोगी शरीर आणि तणावमुक्त मन असणे ही काळाची गरज -आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साध्वी तत्वमयी स्वेरीमध्ये दहावा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा

                                                        

निरोगी शरीर आणि तणावमुक्त मन असणे ही काळाची गरज

                                                                 -आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साध्वी तत्वमयी

स्वेरीमध्ये दहावा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा



पंढरपूर- ‘योगा केल्याने केवळ शरीर सुदृढ आणि निरोगी बनते असे नव्हे तर योगाचे मुख्य ध्येय म्हणजे आपले दैनंदिन जीवन सुलभ करणे हे आहे. योगा हे मानसिक हायजीन असून ते नियमित केले पाहिजे. ध्येय साध्य करण्यासाठी आपण जीवनात संघर्ष करतो. आपले जीवन निरोगी व उत्साही राहण्यासाठी योगा नियमितपणे करणे आवश्यक आहे कारण आयुष्यामध्ये निरोगी शरीर आणि तणावमुक्त मन असणे ही काळाची गरज आहे.’ असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनुयायी व मार्गदर्शक साध्वी तत्वमयी यांनी केले

           गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटच्या भव्य क्रीडांगणावर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदविका), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी), स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दहावा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनुयायी साध्वी तत्वमयी या मुख्य मार्गदर्शन करत होत्या. वेदमंत्राने योग संबंधित उपक्रमाला सुरुवात झाली. यावेळी अनुयायी साध्वी तत्वमयी पुढे म्हणाल्या की, ‘योगामुळे आरोग्य सदृढ होते त्यामुळे दररोज योग करणे गरजेचे आहे. योग हा शरीर, स्वास्थ्य आणि मनाच्या एकाग्रतेबरोबर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम करुन घेतो. त्यामुळे मनाला व शरीराला बळकटी मिळते. मन, शरीर आणि आत्मा संतुलित राहण्यासाठी नियमित योगाची गरज आहे. तसेच ध्यान केल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते त्यामुळे आपण हाती घेतलेले प्रत्येक कार्य गतीने आणि यशस्वी होते. वर्तमान काळात सजग राहून कार्य करणे म्हणजे ध्यान आहे.’ स्वेरीचे संस्थापक-सचिव व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘शरीर उत्तम असेल तर आपले मन उत्तम राहते. मनाच्या स्थितीवर जीवनातील ऊर्जा अवलंबून आहे. यासाठी आसन, प्राणायाम आणि ध्यान याचा जीवनात वापर आवश्यक आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘योग’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करावा असा विषय युनायटेड नेशन्सच्या व्यासपीठावर मांडला आणि त्यानुसार २१ जून हा ‘जागतिक योग दिवस’ म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो.’ ‘नेहरू पुलब्राईट यु. एस. स्टुडंट रिसर्च प्रोग्राम’ च्या माध्यमातून व्हर्जीनिया (वॉशिंग्टन, अमेरिका) येथून स्वेरीमध्ये आलेले झॅकरी मरहंका, विद्यार्थिनी गौरी सराटे आणि विद्यार्थी संदेश विसपुते यांनी योगाबाबत त्यांचे अनुभव सांगितले. यावेळी सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विविध प्रकारची योगासने करवून घेण्यात आली. या दहाव्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक भावेश पारीख, अमृता आनेराव, स्वप्नील मोरे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही. मांडवे, अभियांत्रिकी पदवीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व समन्वयक, कमवा व शिका योजनेचे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले. 


चौकट-

‘स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयात वेळापत्रकानुसार गेल्या १० वर्षापासून दररोज सकाळी नियमित प्राणायाम केला जातो. त्यामुळे विद्यार्थी दिवसभर उत्साही राहतात. आता प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला मुला- मुलींच्या प्रत्येकी तिन्ही वसतिगृहात ‘योग दिन’ साजरा करण्याचे ठरवले आहे.’ -स्वेरीचे संस्थापक-सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad