सुरक्षित जीवनासाठी पर्यावरण जनजागृती आवश्यक
-उपकुल सचिव डॉ. मलिक रोकडे
स्वेरीत ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा
पंढरपूर- 'वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणात नकारात्मक बदल होत आहेत. या बदलांचा मानवी जीवनावर व अस्तित्वावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरण विषयी जनजागृती व वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर वृक्षारोपण हा उपक्रम प्रत्यक्षात परिणामकारकपणे राबविणे अत्यंत गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे उप-कुलसचिव डॉ. मलिक रोकडे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये पर्यावरण जनजागृती, वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली. दि. ५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिना' चे औचित्य साधून पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाचे उप-कुलसचिव डॉ. मलिक रोकडे यांच्या हस्ते स्वेरीमध्ये वृक्षारोपण करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. रोकडे हे वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देत होते. स्वेरीमध्ये शैक्षणिक कार्याबरोबरच समाज हितासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात हे सर्वश्रुत आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्या समन्वयातून विद्यापीठ अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती, वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण अभियान हे दि. ०५ जून पासून ते दि.०२ ऑक्टोबर, २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांच्या परिसरात या अभियानाचा एक भाग म्हणून ‘'एक विद्यार्थी, एक वृक्ष’ तसेच ‘एक कर्मचारी, एक वृक्ष’ या संकल्पना अतिशय प्रभावी पणे राबविण्यात येत आहेत. स्वेरीत शैक्षणिक कार्यक्रमासाठी आलेल्या विविध पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येते. आजपर्यंत स्वेरी ग्रीन टिम च्या माध्यमातून महाविद्यालय व परिसरामध्ये जवळपास १० हजार पेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आल्याची माहिती स्वेरी ग्रीन टीमचे समन्वयक प्रा. के.एस. पुकाळे यांनी दिली. यावेळी माजी नगरसेवक सुधीर धुमाळ, स्वेरीचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.