विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वेरी कटीबद्ध - झॅकरी मरहंका स्वेरीज् पॉलिटेक्निक मध्ये ‘राष्ट्रीय परिषद’ संपन्न

                            

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वेरी कटीबद्ध  

                                                                                  - झॅकरी मरहंका

स्वेरीज् पॉलिटेक्निक मध्ये ‘राष्ट्रीय परिषद’ संपन्न




पंढरपूर- ‘शिक्षण क्षेत्रात स्वेरीने आपल्या कर्तृत्वाने  भक्कम स्थान निर्माण केले असून उत्तम नेतृत्व असल्यामुळे ‘स्वेरी’ नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर असते. शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सोयी स्वेरीमध्ये उपलब्ध आहेत. याचा  विद्यार्थ्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्यातून आपला व राष्ट्राचा विकास साधला पाहिजे. एकूणच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वेरी कटीबद्ध आहे.’ असे प्रतिपादन ‘नेहरू पुलब्राईट यु.एस. स्टुडंट रिसर्च प्रोग्राम’ च्या माध्यमातून वर्जीनिया (वॉशिंग्टन, अमेरिका) येथून संशोधनासाठी आलेल्या झॅकरी मरहंका यांनी केले.

          गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक) मध्ये गेल्या आठवड्यात ‘रिसेंट ट्रेंडस् इन इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी झॅकरी मरहंका हे मार्गदर्शन करत होते. दीप प्रज्वलनानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. अविनाश सपकाळ यांनी राष्ट्रीय परिषदेविषयी सविस्तर माहिती दिली. प्रमुख अतिथी म्हणून  ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (पॉलिटेक्निक) चे प्राचार्य डॉ.श्रीकांत जोशी हे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जोशी म्हणाले की, ‘कोणत्याही यशासाठी आपल्यामध्ये उत्सुकता असायला हवी. अपयश आल्यावर निराश न होता सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणे आवश्यक आहे.’ असे सांगून परदेशातील व भारतीय शिक्षण पद्धती विषयी माहिती दिली. कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ यांनी संशोधनाचे महत्त्व सांगून स्वेरी कॉलेजची संशोधनामध्ये सुरू असलेली वाटचाल आणि पुढील दिशा याबद्दल माहिती दिली. यावेळी खेड (ता. उ. सोलापूर) येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूटचे शैक्षणिक समन्वयक प्रा.श्रीधर कुलकर्णी यांनी स्वेरीने आयोजिलेल्या ‘राष्ट्रीय परिषदे’चे कौतुक केले. या राष्ट्रीय परिषदेमध्ये देशातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या संशोधनाचे सादरीकरण केले. ही परिषद यशस्वी होण्यासाठी सर्व विभागांचे विभागप्रमुख, संशोधन विभागाचे प्रतिनिधी, प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा.गणेश धारेकर यांनी केले तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा.सागर घोडके यांनी आभार मानले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad