स्वेरीत ‘जागतिक पशुवैद्यक दिना’ निमित्त
येत्या रविवारी ‘तांत्रिक परिसंवादा’चे आयोजन
ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे यांची माहिती
पंढरपूर- ‘जागतिक पशुवैद्यक दिना’ निमित्त ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान, पंढरपूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार, दि. २८ एप्रिल, २०२४ रोजी गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये ‘तांत्रिक परिसंवादा’चे तसेच ‘स्व. डॉ. सुहास देशपांडे जीवन गौरव पुरस्कार’ व ‘स्व. डॉ. चंद्रकांत निंबाळकर उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार’ या उपक्रमांचे आयोजन केले आहे.’ अशी माहिती पंढरपुरातील ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वासराव मोरे यांनी दिली.
या कार्यक्रमात सकाळी ८-३० ते ९-०० नोंदणी, अल्पोपहार आणि चहा हा कार्यक्रम तर त्यानंतर सकाळी ९ वाजता साताऱ्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली परभणीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. नितिन मार्कंडे यांचे ‘वंध्यत्व निवारण व व्यवस्थापन’ या विषयावर व त्यानंतर शिरवळच्या केएनपी पशुवैद्यक महाविद्यालयाचे प्रा. डॉ.विठ्ठल धायगुडे यांचे ‘रोगनिदान तपासण्यांचे महत्व’ या विषयावर ‘तांत्रिक परिसंवादाचा’ कार्यक्रम होणार आहे. यावेळी ‘स्व. डॉ. सुहास देशपांडे जीवन गौरव पुरस्कार’ व ‘स्व. डॉ. चंद्रकांत निंबाळकर उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार’ देखील वितरीत केले जाणार आहेत. पुणे विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धनचे सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर यांच्या शुभहस्ते व पशुसंवर्धन विभाग, सोलापूरचे उपायुक्त डॉ. समीर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिलेल्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, पशुसंवर्धन विभाग, पुणेचे उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, सोलापूरचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, महाव्हेटचे अध्यक्ष डॉ. रामदास गाडे, जिल्हा पशु सर्वरोग चिकित्सालय, सोलापूरचे सहाय्यक आयुक्त डॉ. भास्कर पराडे, स्व. डॉ. सुहास देशपांडे जीवन गौरव पुरस्कारार्थी व महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद, नागपूरचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप घोरपडे, पशुसंवर्धन विभागाचे माजी सहआयुक्त डॉ. महेश बनसोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या ‘जागतिक पशुवैद्यक दिना’ निमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.विश्वासराव मोरे, कोषाध्यक्ष डॉ. नंदकुमार होनराव, सचिव डॉ. नंदकुमार सरदेशमुख यांनी केले आहे. यासाठी पंढरपूरच्या पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रियांका जाधव-कोळेकर, तालुका पंचायत समितीचे प्र .सह आयुक्त डॉ. राजेंद्र सावळकर, मंगळवेढ्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. सुहास सलगर हे प्रायोजक म्हणून लाभले आहेत.