*नकली शिवसेना असायला, ती तुमची डिग्री नाही; उद्धव ठाकरे यांचा पलटवार*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना म्हणून केलेल्या टीकेचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. शिवसेना नकली असायला ती काय तुमची डिग्री आहे का? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर पलटवार केला. ते सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित कर्णिक नगर येथील सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सोलापूर लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यास महाविकास आघाडीतील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी दुपारी सोलापुरातील होम मैदानावर जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना मोदी यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली असल्याची टीका केली होती. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
ठाकरे पुढे म्हणाले की, भाजपकडून ४०० पारचा नारा दिला जात आहे. परंतु त्यांना देशाची घटना बदलायची आहे. कारण त्यांना दलितांविषयी एक प्रकारचा आकस आहे. एका सामान्य कुटूंबातून आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या घटनेवर देश चालवायचा का अशी भावना भाजपच्या मनात आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांना वाटते की, मी एवढे प्रयत्न करतो. तरी जनता मला देव मानत नाही. मात्र जनता डॉ. बाबासाहेब यांना देव मानते. हे खरे मोदींचे दुखणे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
*स्वामी जी भाजपला तुम्ही शाप द्या.*
सोलापूरचे विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या उमेदवारीवरून बोलताना ठाकरे म्हणाले, स्वामी देखील हिंदुत्ववादी होते. ज्या प्रमाणे अमरावतीच्या नवनीत राणांचा जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवला. त्याप्रमाणे हिंदुत्ववादी असलेल्या स्वांमीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न का नाही सोडवला?, असा सवालही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच भाजपची वापरा आणि फेकून द्या ही कुटनिती स्वामीजींच्या देखील लक्षात आली असेल. त्यामुळे आता स्वामीजी यांनी भाजपला शाप द्यावा, असे खोचक आवाहन देखील ठाकरे यांनी यावेळी केले.
*फडणवीस यांचा घेतला समाचार*
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी टरबूज, फडतूस, कलंक असा उल्लेख करणार नाही कारण ते त्यांना झोंबत, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, फडणवीस यांनी कोरोना काळात नरेंद्र मोदी यांनी देशाला लस देऊन सर्वाचे प्राण वाचवले. त्याचे आभार म्हणून मोदींना मत द्या, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाचा समाचार घेताना, जर मोदींनी लस दिली असेल तर संशोधक काय गवत उपटत होते का? अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली. तसेच लस मोदी यांनी नाही तर महाराष्ट्रातील पुनावाला यांनी तयार केली आणि महाराष्ट्रात ती लस आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली. याचा मला अभिमान असल्याची देखील ठाकरे म्हणाले.
दरम्यान, प्रणिती शिंदे यांना येत्या ७ मे रोजी हाताच्या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुतमाने विजयी करा. त्या विजयी सभेसाठी मी ४ जून रोजी पुन्हा एकदा सोलापुरात येईन, असे आश्वासन देखील ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिले.
*उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले नाही – शिंदे*
यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोलताना दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ठाकरे यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही शब्द पाळणारे नेते आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी त्यांचे हिंदुत्व सोडलेले नाही. मात्र सर्वधर्म समभाव ही भूमिका घेऊन ते पूढे जात आहेत. देश वाचवण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली असल्याचेही शिंदे म्हणाले. पंतप्रधान मोदी हे हुकमशाही आणण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ही यावेळी सुशिलकुमार शिंदे यांनी मोदींवर केली.
सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न केला तर खबरदार हे हुतात्म्यांचे शहर आहे, असा इशारा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मोदींसह भाजपला दिला. तसेच सोलापूरच्या गड्डा यात्रेत देखील जास्त गर्दी होत असते, अशी टीका ही प्रणिती शिंदे यांनी मोदींच्या सोलापुरात झालेल्या सभेवर केली.
दरम्यान, या जाहीर सभेप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, उपनेते अस्मिता गायकवाड, प्रवक्ते शरद कोळी, समन्वयक पुरुषोत्तम बरडे, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी, गणेश दादा वानकर, अमर पाटील, संभाजी शिंदे, धनंजय डीकोळे, उमेश सारंग, प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर, दत्ता माने, कम्युनिस्ट पार्टीचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रकाश यलगुलवार काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर महेश अण्णा कोठे, UN बेरिया, भारत जाधव, प्रेमलाल लोधा, देवाभाऊ गायकवाड, अशोक निंबर्गि, देवेंद्र भंडारे, विनोद भोसले, गणेश डोंगरे, भीमाशंकर टेकाळे, सुदीप चाकोते, आदीसह महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.