'स्वेरी'कडून मृदासंवर्धन आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती
गोपाळपूर आणि ओझेवाडी येथे उपक्रम
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी गोपाळपूर आणि ओझेवाडी (ता.पंढरपूर) मध्ये जाऊन मृदासंवर्धन आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती केली. या मार्गदर्शनामुळे शालेय विद्यार्थ्यांना जमीन, माती आणि पाण्याचे महत्व समजले.
सध्या एकीकडे कडक उन्हाळा जाणवत आहे तर दुसरीकडे पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. काही ठिकाणी तर दुष्काळी परिस्थिती देखील जाणवत आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. तसे केले तरच भविष्यात पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी आपल्याला पाणी उपलब्ध होऊ शकते. आपण जसे धरणे बांधून पाणी साठवतो त्याचप्रमाणे आपण जमिनीत पाणी जिरवून पाण्याची जमिनीतील पातळी वाढवू शकतो. धरणे बांधण्यास खूप आर्थिक खर्च येतो त्यासाठी भरपूर जागा देखील लागते, पण पाणी जिरविण्यासाठी आपल्याला उपलब्ध जमिनीचा उपयोग करुन तांत्रिकदृष्ट्या बंडिंग करुन पाणी जिरवता येते. 'स्वेरी'चे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता व सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली, प्रा. अविनाश कोकरे, प्रा. योगेश सुरवसे, प्रा. सत्यवान जगदाळे, प्रा. गणेश कोष्टी, प्रा. निशिगंधा महामुनी, प्रा. चैताली अंभगराव यांच्यासह सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी या जनजागृती उपक्रमात सहभाग घेतला. प्रारंभी ओझेवाडी येथील आचार्य दोंदे विद्यालयाचे प्राचार्य सुहास क्षीरसागर यांनी स्वेरीच्या प्राध्यापकांचे स्वागत केले त्यानंतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्यामागील हेतू स्पष्ट केला. यावेळी स्वेरीचे विद्यार्थी व प्राध्यापकांनी गोपाळपूर आणि ओझेवाडी या ग्रामीण भागातील शाळांमध्ये जावून तेथील विद्यार्थ्यांना भविष्याचा विचार करून पाण्याचा काटकसरीने व काळजीपूर्वक वापर करण्याबाबत जनजागृती केली. यावेळी आचार्य दोंदे विद्यालय,ओझेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोपाळपूर मधील विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन केले. पाणी नसताना काळजी करण्यापेक्षा असलेले पाणी जपून आणि कमी प्रमाणात वापरण्याचे त्यांनी स्वेरीच्या प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना आश्वासन दिले. तेथील विद्यार्थ्यांनी 'स्वेरी'चे प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पाणी, माती, जमीन, समतलपणा, जमिनीची धूप आदीबाबत विविध प्रश्न विचारले असता त्यांनी त्या प्रश्नांची अभ्यासपूर्वक आणि समाधानकारक उत्तरे दिली. ग्रामीण भागात केलेल्या जनजागृतीमुळे ग्रामस्थ आता यापुढे काटकसरीने पाणी वापरतील हेच यावरून लक्षात येते. यावेळी गोपाळपूरचे सीमा पोतदार, विजय महादेव चंदनशिवे आणि ओझेवाडीचे नारायण देशमुख यांच्यासह तेथील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.