*पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा पालक मेळावा उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शनिवार दिनांक १६ मार्च २०२४ रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग पालक मेळावा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम, पालक प्रतिनिधी म्हणून राजेंद्र डोंगरे, सुजाता कुलकर्णी आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम प्रास्ताविक करताना म्हणाले, पाल्याच्या प्रगतीची माहिती पालकांना व्हावी यासाठी महाविद्यालयाकडून पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. महाविद्यालयात नियमित होत असलेल्या क्लास मध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्य नसल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांनी दैनंदिन कार्यक्रमाचे नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल कमी प्रमाणात वापरणे आवश्यक आहे. शैक्षणिक गोष्टी मोबाईल मधुन शिकण्यासाठी आहेत. त्याचा वापर योग्य होणे आवश्यक आहे. वर्गात मोबाईलचा वापर करणे टाळणे गरजेचे आहे. मुडल साॅफ्टवेअर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती भेटत आहे. आयुष्यातील एका यशस्वी टप्प्यात आपण आला आहात याचे गांभीर्य लक्षात घेऊन अभ्यास करा. विद्यार्थ्यांनी पहिल्या परिक्षेत अपयश आले म्हणून खचून जाऊ नका पुन्हा अभ्यास करून यश मिळवण्याची जिद्द असली पाहिजे. विद्यार्थी गैरहजर असल्यास महाविद्यालयाकडून घरी फोन करत असतो अशा वेळेस पालकांचे सहकार्य असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यां सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मत प्रा. अनिल निकम यांनी प्रास्ताविक प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर बोलताना म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांकडे कौशल्य आहे अशा विद्यार्थ्यांना नोकरी भेट असते. वेळेचे सदुपयोग करणे आवश्यक आहे. चार वर्षाच्या शैक्षणिक वर्षांत आपण इतर स्पर्धेत भाग घेणे आवश्यक आहे. महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेणे आवश्यक महाविद्यालयात अनेक नामांकित कंपन्या भेट देत आहेत. या मधुन अनेक विद्यार्थ्यांची निवड होत असल्याचे मत डॉ. समीर कटेकर यांनी बोलताना व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्याकडून घेण्यात आलेल्या प्रथम सञ परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाकडून सन्मान करण्यात आला.
यावेळेस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून महाविद्यालय व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार व्यक्त केले. दरम्यान पालक प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना संबोधित केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डाॅ. दिपक गानमोटे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.