श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुधारणे साठी १५० कोटी रुपयांचा निधी
आ. समाधान आवताडे यांनी केली होती वाढीव निधीची मागणी
प्रतिनिधी : पंढरपूर
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवतांच्या मंदिरांच्या सुधारणे साठी राज्य शासनाने १५० कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली. नागपूर अधिवेशन काळात पुरवणी बजेट मध्ये यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरांचा काया पालट होणार आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान हे दक्षिण काशी मानले जाते. येथील श्री विठ्ठल, रुक्मिणी आणि परिवार देवतांची मंदिरे शेकडो वर्षे पुरातन आहेत. काळाच्या ओघात त्यामध्ये वेळी वेळी रंग रांगोटी आणि दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र अलीकडे ही मंदिरे अधिक जीर्ण झाल्याचे, त्यांचे पुरातन स्वरूप हरवल्याचे दिसू लागले होते. त्यामुळे राज्य सरकारने श्री विठ्ठल रुक्मिणी आणि परिवार देवतांच्या मंदिरांच्या सुधारणे साठी यापूर्वीच ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे..मंदिर सुधारणेचा आराखडा मंजूर असून प्रत्यक्ष कामकाजास कार्तिकी यात्रेपासून सुरुवात झालेली आहे. मात्र ७३ कोटी रुपयांचा निधी मंदिरांच्या विकासासाठी आणि मजबुती करण्यासाठी पुरेसा ठरणार नाही, याकडे आमदार आवताडे यांनी कार्तिकी एकादशी वेळी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. तसेच वाढीव १५० कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणीही केली होती. त्या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मंदिर सुधारणेसाठी १५० कोटी रुपये हिवाळी अधिवेशन दरम्यान मंजूर केले आहेत.
या संदर्भात अधिक माहिती देताना आ. आवताडे म्हणाले की, श्री विठ्ठल रुक्मिणी हे देवस्थान भारताची दक्षिण काशी आहे. राज्यातील आणि देशातील इतर मंदिरांच्या तुलनेत विठ्ठल रखुमाईच्या मंदिराचा विकास होणे आवश्यक आहे. मंदिर पुरातन असून त्याची जपणूक करण्यासाठी मजबुतीकरण आवश्यक आहे. शिवाय विठ्ठल रुक्मिणी परिवार देवतांची मंदिरे शहरात विविध भागात आहेत. वारकरी संप्रदायात त्यांचेही एक विशिष्ट स्थान आहे. त्याही देवस्थानचा विकास होणे आवश्यक असून त्यामुळे पंढरीच्या अध्यात्मिक वैभवात भर पडणार आहे. सध्या मंजूर ७३ कोटी रुपयांचा निधी ही सर्व मंदिरे सुधारणे साठी कमी पडणार आहे, याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनीही या कामी सकारात्मक प्रतिसाद देऊन १५० कोटींचा निधी मंजूर करण्यास सहकार्य केले आहे. या निधीतून विठ्ठल, रुक्मिणी मंदिरांसह परिवार देवतांच्या मंदिरांची ही सुधारणा होणार आहे.