स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून आषाढी वारी निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
पंढरपूर- पंढरपूरमध्ये मुख्य चार एकादशीच्या वारींपैकी आषाढी वारी ही सर्वात मोठी असते. या वारीच्या काळात पंढरी नगरीत राज्यातील विविध भागांतून तसेच कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यातून जवळपास १० लाख वारकरी पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाप्रती बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीने व प्रशासनावर येणारा अधिकचा ताण कमी करण्याकरिता वारी काळात 'स्वेरी' नेहमीच कार्यरत असते. स्वेरी स्थापनेपासूनच शिक्षणाबरोबर सामाजिक कार्यात देखील नित्य योगदान देत आलेली आहे.
स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आषाढी वारीच्या या काळात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी दि. २६ जून ते ०६ जुलै २०२३ या कालावधीत आषाढी वारी व्यवस्थापन कार्यात सहभागी होवून पोलीस प्रशासनाला अनमोल सहकार्य करत आहेत. स्वेरीच्या एन.एस.एस. चे स्वयंसेवक पोलीस प्रशासनास मदत व समाजकार्याच्या दृष्टीने 'तीर्थक्षेत्र पोलिस' तथा 'पोलीस मित्र' म्हणून वारकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करत आहेत. यावर्षी आषाढी वारीत वारकऱ्यांची वाढती गर्दी पाहता जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे ‘तीर्थक्षेत्र पोलीस २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘पोलीस मित्र’ म्हणून कार्य करत असताना स्वेरीचे विद्यार्थी पंढरपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाबाई पटांगण, महात्मा फुले चौक, सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, गौतम विद्यालय परिसर या महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्रांच्या माध्यमातून चुकलेल्या वारकऱ्यांना त्यांचे नातेवाईक शोधण्यात मदत करत आहेत तसेच गर्दी नियंत्रणासाठीही विद्यार्थ्यांचे समूह कार्य करत आहेत.
'निर्मल वारी, हरित वारी' या उपक्रमाच्या माध्यमातून स्वेरीच्या
राष्ट्रीय सेवा योजना विभागातील
विद्यार्थ्यांकडून वारीपूर्व स्वच्छतेचा एक भाग म्हणून गोपाळपूर मंदिर, रिद्धी सिद्धी गणपती, दर्शन रांग, कालिका देवी मंदिर, काळा मारुती चौक, चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्रदक्षिणा मार्ग आदी भागाची स्वच्छता करण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमेत स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील जवळपास १०० विद्यार्थी व विद्यार्थिनी सलग दोन दिवस सहभागी झाले होते. वारीनंतरही नदी व वाळवंट परिसरात स्वच्छता केली जाणार आहे.
'वारकऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचे वाटप' या उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांना जेवणासाठी प्लॅस्टिक किंवा थर्माकोलच्या पत्रवाळीच्या ऐवजी केळीच्या पानांचे वाटपही करण्यात आले. स्वेरीच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या कार्यामुळे प्रशासनावरील बंदोबस्ताचा ताण थोड्या प्रमाणात का होईना, कमी झाला. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या नेतृत्वाखाली, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धनंजय चौधरी, फार्मसीचे रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमंत बनसोडे यांच्या सहकार्याने स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदवी व पदविका) व कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी व पदविका) या महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थी या सेवेत सहभागी झाले होते. आषाढी वारी मध्ये स्वच्छतेसह विविध हितावह उपक्रम राबविल्यामुळे स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.