थोर पुरुषांच्या उदात्त विचारांचे अनुकरण केले पाहिजे -शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार
स्वेरीमध्ये ३५० वा ‘शिवराज्याभिषेक दिन’ उत्साहात साजरा
पंढरपूर- ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे कष्ट आणि परिश्रम पाहता त्यांना देव म्हणण्याऐवजी ‘युगपुरुष’ म्हणूया. कारण देव एका चाकोरीत मर्यादित राहत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करताना केलेले कार्य अत्यंत अदभूत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याला सीमित करता येणार नाही. त्यांचे नेतृत्व, सवंगडी जमा करण्यासाठीचे कौशल्य, गड, किल्ले जिंकताना अवाढव्य शत्रूसमोर नियोजन पद्धतीने मिळविलेला विजय या सर्व बाबी पाहिल्यास आज त्यांच्या अनेक गोष्टी अंगीकृत करणे गरजेचे आहे, हे लक्षात येते. आज ३५० वर्षे झाली तरीही आपण छत्रपती शिवरायांच्या कार्याकडे अभिमानाने पाहतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशक्यप्राय कार्यामुळेच आज देशात सर्वात समृद्ध राज्य म्हणून महाराष्ट्राचा आवर्जून उल्लेख केला जातो. भारतातील कोणत्याच राजांना जे जमलं नाही ते अवघड कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवले. गुलामगिरी नष्ट करून महाराष्ट्रातील जनता सुखी व समृद्ध जीवनाच्या मार्गावर आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी हाती घेतलेल्या कार्याचा वसा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. महाराजांच्या प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी आहे. म्हणून थोर पुरुषांच्या उदात्त विचारांचे अनुकरण केले पाहिजे.’ असे प्रतिपादन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील 'राष्ट्रीय सेवा योजना' या विभागाच्या वतीने काल मंगळवार दि. ६ जून २०२३ रोजी ३५० वा ‘राज्याभिषेक दिन’ तथा 'शिवस्वराज्य दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार हे ‘शिवराज्याभिषेक दिना' चे महत्व विशद करत होते. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक घालून वंदन करण्यात आले. यावेळी ऋतुजा कुपाडे यांनी उत्तम आवाजात शिवगर्जना केली तर आदिती कोरके यांनी सुरेल आवाजात शाहिरी पोवाडा सादर केला. जयश्री निकम व आदिती डोके या विद्यार्थीनींनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस.मठपती, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धनंजय चौधरी, डॉ. श्रीकृष्ण भोसले, प्रा. मनसब शेख, प्रा. रविकांत साठे, प्रा. अविनाश कोकरे, यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी उपस्थित होते. स्नेहल अंबुरे व ऐश्वर्या मोहिते यांनी भगव्या रंगांचा खुबेने वापर करून आकर्षक रांगोळी काढली होती. सूत्रसंचालन श्रद्धा बिराजदार व पूजा फुकाडे यांनी केले तर विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस. मठपती यांनी आभार मानले.