स्वेरीमध्ये पीएलसी व एससीएडीए याविषयी पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न
पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर (पीएलसी) व सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा अॅक्वीझेशन (एससीएडीए) याविषयी पाच दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या सहकार्याने आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या कार्यशाळेत अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत मंगळूर (कर्नाटक) मधील इंडवेल ऑटोमेशनचे संस्थापक हिमांशु कुमार यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वेरी नेहमीच प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांनी केले. या प्रसंगी बोलताना डॉ.मिनाक्षी पवार म्हणाल्या की ‘विद्यार्थ्यांनी सॉफ्ट्वेअर सोबत हार्डवेअर क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करून आपले कौशल्य वाढवावे.’ या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सदर विषयातील मुलभुत संकल्पना ते आधुनिक तंत्रज्ञान व प्रात्यक्षिक अनुभव करून देण्यात आला. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पीएलसीची मुलभूत ओळख करून देऊन त्याचे विविध औद्योगिक उपयोग यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी लहान प्रात्यक्षिके व पीएलसी मध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध इनपुट-आउटपुट स्वरूपाच्या उपकरणांची व त्यासाठी आवश्यक अशा सॉफ्टवेअरची ओळख करून देण्यात आली. कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी एससीएडीए या विषयावरची मुलभुत प्रात्यक्षिके व त्याचा औद्योगिक क्षेत्रातील उपयोग यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेच्या चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांनी एसी मोटर वापरून छोटे प्रयोग केले. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी एचएमआयचे उपयोग या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच सहभागी विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना कोअर विभागातील नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी ट्रेनर हिमांशु कुमार यांनी स्वेरीच्या सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच स्वेरीमध्ये होत असलेल्या विविध विद्यार्थीपूरक उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी स्वेरी व इंडवेल ऑटोमेशन, मंगळूर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. सदर कार्यशाळेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या कार्यशाळेत प्रा.जगदीश हल्लुर व प्रा.सागर वाघचवरे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन सृष्टी जगदाळे यांनी केले तर प्रा.महुआ बिश्वास यांनी सर्वांचे आभार मानले.