सोलापूर येथील ‘डिप्लोमा युथ फेस्टिवल’ मध्ये स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयाचे घवघवीत यश
पंढरपूर- इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीइ) व इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (आयइआय) यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरमध्ये नेहरूनगर मधील शारीरिक शिक्षण महाविद्यालयात ‘डिप्लोमा युथ फेस्टिवल’ चे आयोजन करण्यात आले होते. या युथ फेस्टिव्हल मध्ये सोलापूर जिल्हयातील विविध महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमांतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वेरीने वार्षिक परीक्षांचे निकाल, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि प्लेसमेंटमधून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याबाबत सातत्यपूर्ण आघाडी टिकवली आहे. आता यात आणखी भर पडली असून विविध क्रीडा प्रकारांत देखील स्वेरी सातत्याने यशस्वी होत आहे. ‘डिप्लोमा युथ फेस्टिवल’ मध्ये विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलांनी खो खो, हॉलीबॉल व फुटबॉल या क्रीडा विभागात विजेतेपद तर बास्केटबॉलमध्ये उपविजेतेपद मिळविले. विद्यार्थ्यांप्रमाणे विद्यार्थिनी देखील खेळात अग्रेसर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विद्यार्थिनींनी बास्केटबॉल खेळात विजेतेपद मिळवले तर ४०० मीटर या खेळात उपविजेतेपद मिळवले. तसेच वैयक्तिक खेळामध्ये ४०० मीटर रनिंग या खेळात निकिता विजय जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवला. सांस्कृतिक स्पर्धेत ग्रुप डान्स, म्युझिकल स्किट व रांगोळीमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा विभागाचे समन्वयक प्रा.आकाश पवार, प्रा.सुरज पवार व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. अजिंक्य देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी खेळाडूंचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.