पंढरपूर सिंहगड मध्ये सावित्रीबाई गर्ल्स फोरम, रोटरी क्लब व लायन्स क्लब यांच्यावतीने महिला आरोग्य मार्गदर्शन

 *महिलांमध्ये आरोग्याविषयी जागृती आवश्यक- डाॅ. सुजाता गुंडेवार*


○ पंढरपूर सिंहगड मध्ये सावित्रीबाई गर्ल्स फोरम, रोटरी क्लब व  लायन्स क्लब यांच्यावतीने महिला आरोग्य मार्गदर्शन


पंढरपूर: प्रतिनिधी




"जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जग उद्धारी' या उक्तीप्रमाणे महिलांनी स्वत:चे आरोग्य चांगले सांभाळले, की कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. त्यांच्यासोबत समाजाचे व देशाचे आरोग्यही राखले जाते. महिला स्वत:च्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतात. त्यामुळे भारतातील स्त्रियांमध्ये रक्तक्षयाची सर्वांत मोठी समस्या आहे. व्यायामाचा अभाव, असंतुलित, अवेळी आहार, ताणतणाव ही सर्व कारणे महिलांच्या आरोग्यास धोकादायक असतात.  सध्याच्या काळातील थॉयरॉईड हार्मोनच्या कमी-जास्त प्रभावामुळे होणारे पीसीओडी, पीसीओएस, वंध्यत्व यांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी स्त्रियांनी वेळेवर आहार, वयानुसार योग्य तो व्यायाम करणे गरजेचे आहे. महिलांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे मत डाॅ. सुजाता गुंडेवार यांनी सिंहगड कॉलेज मध्ये बोलताना व्यक्त केले.




 यावेळी पुढे बोलतना त्या म्हणाल्या, सद्या उष्णतेचे प्रमाण बघता प्रत्येक स्त्रीने तीन-चार लिटर पाणी, लिंबू-सरबत आदी दिवसभरात घेणे गरजेचे आहे. रक्तक्षय टाळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, शेंगालाडू, पेंडखजूर, अंजीर, डाळिंब इ. सेवन करणे गरजेचे आहे. महिलांनी वयाच्या ३५ ते ४० नंतर रक्तातील साखरेचे प्रमाण, ब्लडप्रेशर, स्त्रीरोग तज्ज्ञांकडून स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाची तपासणी नियमित करणे गरजेचे आहे. मुलींच्या समस्येतील असलेली अनियमितता, अतिरिक्त लव, वाढणारे वजन यामुळे भावी आयुष्यात होणारे परिणाम टाळायचे असतील तर योग्य आहारविहार, व्यायाम व आवश्‍यक त्या तपासण्या व स्त्रीरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. 

आई आणि शाळेतील शिक्षिकांनी मुलींना मासिक पाळीसंदर्भात मार्गदर्शन करणे, ही काळाची गरज आहे. मासिक पाळी बंद झाल्यानंतर हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे हाडांचा ठिसूळपणा वाढतो. त्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्या उद्घभवतात. यासाठी नियमित हाडांची तपासणी करून गरजेप्रमाणे कॅल्शियमच्या गोळ्या घेणे गरजेचे असल्याचे डाॅ. सुजाता गुंडेवार यांनी म्हटले.



    एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये बुधवार दिनांक २९ मार्च २०२३ रोजी सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, रोटरी क्लब ऑफ पंढरपूर, लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे, डाॅ. सुजाता गुंडेवार, लायन्स क्लब पंढरपूर अध्यक्ष ललिता कोळवले-जाधव, सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम चे चेअरमन प्रा. अंजली पिसे, प्रा. अंजली चांदणे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

   या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी श्रद्धा कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सोनाली घोडके यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad