कोरोना पुन्हा वाढतोय! देशात आढळले मागील ६ महिन्यातील सर्वाधिक रुग्ण
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ पाहायला मिळत आहे.
गेल्या 24 तासांत राज्यात 483 कोव्हिडबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 3 जणांच्या मृत्यूची माहिती समोर आल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
राज्यात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2,506 इतकी असून गेल्या 24 तासांत 317 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करून भारतात दाखल होणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी अद्यापही राज्यात सुरुच आहे.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळांवर दाखल होणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून हालचाली सुरू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात मागच्या 24 तासात 2151 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
यामुळे आता देशभरातल्या सक्रिय रूग्णांची संख्या 11 हजार 903 इतकी झाली आहे. त्यापैकी 2506 सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात असल्याने आरोग्य प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्याचं दिसून येतं.
काल (बुधवार, 29 मार्च) महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली कोव्हिड तयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत संचालक, सहसंचालक, उपसंचालक तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत कोव्हिडच्या अनुषंगाने राज्य आणि जिल्हा स्तरावर रुग्णालयांची तयारी, मॉकड्रील बाबतच्या सूचना आणि औषधसाठा व इतर साधन सामग्रीबाबत तयारीचा आढावा घेण्यात आला.
यानंतर राज्यातील जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनाला खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा-महापालिका प्रशासनाला सूचना -
रुग्णालय स्तरावर आणि कार्यक्षेत्रात भेटीदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी ILI/SARI सारख्या आजारांची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करावी. (ILI - सौम्य ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे. SARI - तीव्र ताप, श्वसनास त्रास होणे, धाप लागणे, तीव्र स्वरुपाचा खोकला लागणे इ.)
कोव्हिड जिनोम सिक्वेन्सिंगसाठी RTPCR पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने नियमित पाठवावेत.
कोव्हिडच्या तयारीबाबत मॉकड्रील दिनांक 10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व संस्थांमध्ये घेण्याची सूचना
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या मार्गदर्शक सूचना, घरी विलगीकरणांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
रुग्णालयात औषधी व साहित्य उपलब्ध राहतील, याची खातरजमा करावी.
प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावे.
नागरिकांसाठी सूचना -
वृद्धांनी आणि विशेषतः सहव्याधी (को-मॉर्बेडिटी) असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे.
डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयांमध्ये मास्कचा वापर करावा.
गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरणे.
शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल/टिश्यू पेपरचा वापर करावा.
हाताची स्वच्छता राखावी. वारंवार हात धुवावेत.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे.
सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, श्वसनास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर कोव्हिड चाचणी करावी.
श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करावा.
कोव्हिड उपचार आणि निदानाची सोय सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.
सर्व व्यक्तींनी बूस्टर डोसचे लसीकरण करावे.
सौम्य लक्षणे असल्यास स्वतः खात्री करून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोव्हिड चाचणी करावी.
लक्षणे सौम्य असली तरी कोव्हिडचा प्रसार इतरांना होऊ नये यासाठी कार्यालयात, शाळा, महाविद्यालये, गर्दीच्या ठिकाणी न जाता पूर्ण बरे होईपर्यंत स्वतः घरी अलगीकरण करावे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत