तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची २६ मार्च रोजी लोहा येथे जाहीर सभा
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार*
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समितीचे जाळे महाराष्ट्रात विस्ताराला सुरुवात केली असून येत्या २६ मार्च रोजी लोहा येथे के.चंद्रशेखर राव यांची भव्य जाहिर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी लोहा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अबकी बार किसान सरकार असे म्हणत येत्या २६ मार्च रोजी लोह्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातही तेलंगणाच्या धर्तीवर येथील शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा बी आर एस च्या झेंड्याखाली राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा संघटित करू असे सांगून शेतकऱ्यांच्या हिताचे असलेले, त्यांनी तेलंगणात कोणकोणत्या योजना अंमलात आणल्यात हे येथील जनतेला माहिती होण्याच्या अनुषंगाने भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची सभा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी पुनरूच्चार केला. या सभेस एक लाखाच्या जवळपास जनता उपस्थित राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी दत्ता पवार, मनोहर पाटील भोसीकर,छत्रू महाराज, शिवराज धर्मापुरीकर, प्रल्हाद पाटील फाजगे,जि.प.उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे हे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे म्हणाले की, मी गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत असून मला न्याय मिळाला नाही.तेलंगणा सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत असून त्या कामावर मी खुश होऊन भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. येत्या 26 तारखेला
हजारो कार्यकर्ते भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा शंकर अण्णा धोंडगे यांनी दिली