शेलगाव (धा) येथील संभाव्य साठवण तलाव रद्द करण्याच्या मागणीसाठी गावकरी सरसावले

 ▪️ शेलगाव (धा) येथील संभाव्य साठवण तलाव रद्द करण्याच्या मागणीसाठी गावकरी सरसावले 

▪️अनोखे चूल बंद आंदोलन करून केला शासन निर्णयाचा विरोध



*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार* 




            तालुक्यातील शेलगाव (धा) शिवारात साठवण तलाव करण्यासाठी महविकास आघाडी राज्य सरकारच्या कार्यकाळात ॲक्टोबर २०२१ मध्ये राज्य शासनाकडून तलावास मंजुरी देण्यात आली. मात्र सदरील गाव हे लिंबोटी धरणाच्या लाभक्षेत्रात येत असताना आणि गावकऱ्यांनी तलावाची मागणी केलेली नसताना होऊ घातलेला नियोजित साठवण तलाव म्हणजे शेलगाव (धा) येथील शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आणि ग्रामस्थांना देशोधडीला लावणारा प्रकल्प असल्याने संपूर्ण गावकरी सदरील साठवण तलावास विरोध करण्यासाठी सरसावले असून दि. २५ जानेवारी रोजी बुधवारी शेलगाव ग्रामस्थांनी अनोखे "चूल बंद आंदोलन" व एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून साठवण तलावास तीव्र विरोध दर्शविला.  

                   शेलगाव (धा) हे लोहा तालुक्यातील जवळपास १६०० लोकसंख्येचे छोटे खेडेगाव असून या गावातील प्रमुख व्यवसाय हा शेती आणि शेतीशी पूरक असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा पूर्णपणे शेतीवरच अवलंबून असल्याने त्यांच्या शेतावरच आता संक्रात येणार असल्याने ग्रामस्थ प्रचंड धास्तावले आहेत. मागील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेलगाव (धा) येथील ग्रामस्थ व शेतकऱ्याना कसलीही विचारणा न करता किंवा त्यांना विश्वासात न घेता दि. १४ अक्टोबर २०२१ रोजी शेलगाव शिवारात अंदाजे साडेसहाशे हेक्टर शेतजमीनीवर साठवण तलाव मंजूर केले आहे. तलावाच्या संदर्भात पुढील प्रक्रिया थांबविण्यात यावी यासाठी प्रशासनाकडे तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयास नियोजित साठवण तलाव विरोधातील ग्रामसभेचा ठराव आणि निवेदन देण्यात आले असून अद्यापपर्यंत शासनस्तरावरून कसलाच निर्णय घेण्यात आला नसल्याचे आंदोलनकर्त्याने सांगितले. तसेच मविआ काळातल्या मनमानीमुळे झालेला अन्याय दुर करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

            सदर नियोजित साठवण तलावामुळे शेलगाव (धा) येथील जवळपास शेकडो शेतकरी प्रभावीत होणार असून बहुतांश अल्पभूधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडतील त्यामुळे कसल्याही परिस्थितीत नियोजित साठवण तलाव शिवारात होऊ देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिनी शेलगाव ग्रामस्थांनी अनोखे चूल बंद आंदोलन करत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून सरकारच्या निर्णयाचा विरोध दर्शविला.

             शासनाकडून सदरील नियोजित साठवण तलाव रद्द न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे गावकऱ्यांकडून सांगितले. यावेळी शेकडो गावकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad