मराठी भाषिकांनी न्यूनगंड न बाळगता दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा - कवी पत्रकार सचिन कुलकर्णी
मा.ह.महाडिक महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा
पंढरपूर - प्रतिनिधी
"मराठी भाषिकांनी न्यूनगंड न बाळगता दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा", असे प्रतिपादन पत्रकार कवी सचिन कुलकर्णी यांनी केले आहे महाराष्ट्र शासन व महाडिक कला व वाणिज्य महाविद्यालय, मोडनिंब मराठी विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते "आपण जन्मदात्या आईप्रमाणेच देश आणि भाषेला आईचा दर्जा देतो आणि आईला कधीच कमी लेखता येत नाही या भाषेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, हे राष्ट्रपुरुष बोलत होते, तीच भाषा आपण बोलतो या गोष्टीची लाज नाही तर अभिमान वाटला पाहिजे", असे ते पुढे बोलताना म्हणाले
प्राचार्य डॉक्टर एसटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमा वेळी प्राध्यापक डॉ. वामन जाधव, डॉ. सुहास पाटील, डॉ. संजय गायकवाड, डॉ. सौदागर साळुंखे, डॉ. सुभाष गायकवाड, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले प्राध्यापक डॉक्टर वामन जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचा हेतू विषद करून, प्रमुख वक्ते सचिन कुलकर्णी यांचा परिचय करून दिला उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न झाल्यानंतर पत्रकार कवी सचिन कुलकर्णी यांनी मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला प्राचार्य डॉ. एस. टी. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की ,"मराठी भाषेतच अनेक संतांनी आपल्या रचना केल्या आहेत, त्यामुळे मराठीचा सन्मान तोच आपला सन्मान. मराठी भाषा टिकवणे, जगवणे हे आपले परम कर्तव्य आहे". या छोटेखानी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष गायकवाड यांनी केले तर प्रा. डॉ. संजय गायकवाड यांनी आभार मानले यावेळी महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. पी.बी. भांगे, तसेच प्राध्यापक स्वाती बेलपत्रे आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाना मंडले, बंटी सुर्वे, बंडू आदलिंगे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.