ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक साठी बेरळीतून सौ.ज्योती बुध्दे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी शुभम उत्तरवार *
तहसिल कार्यालय लोहा येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी बेरळी खुर्द येथील वार्ड क्रमांक ३ मधुन अपक्ष सर्वसाधारण महीला प्रवर्गातून सौ.ज्योती बुध्दे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डि.व्हि.रामरूपे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कवटीकवार एस.आर.यांच्या कडे दाखल केला.यावेळी पत्रकार संरक्षण समिती लोहा तालुकाध्यक्ष बाळासाहेब बुध्दे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरपंच पद,सदस्य पद किंवा कोणतेही पद मोठेपणासाठी छाती काढून गावभर फिरण्यासाठी पद नसून हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी,गावाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी,गावातील प्रत्येक समस्याच निवारण करण्यासाठी ग्रामपंचायतीवर पाठवलेला गावचा एक जबाबदार नागरिक आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ज्या पॅनलचे वर्चस्व आहे किंवा ज्या पॅनलचे जास्त संख्याबळ आहे त्याच पॅनलचा सरपंच निवडला जात होता, यामुळे अंगठेबहाद्दर व्यक्तीलाही सरपंच व सदस्य पदाचा मान मिळत होता, परंतु त्यांच्या अशा निर्णयामुळे गावाचं होणारं नुकसान हे गावच्या नागरिकांना आपसूकच सहन करावं लागत होतं.
ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत कशी होईल याकडे लक्ष देऊन आपलीही ग्रामपंचायत मॉडेल ग्रामपंचायत बनली पाहिजे यासाठी आपण सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवणार आहोत असे यावेळी बोलताना सौ.बुध्दे म्हणाल्या.
आपल्या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या गावचा सरपंच किंवा सदस्य निवडताना पैशाच्या लोभाला किंवा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, उमेदवाराची पारख करा,कोणता उमेदवार आपल्या गावाच्या विकासात भर पाडू शकतो, कोणता उमेदवार टक्केवारी न खाता काम करू शकतो,कोणता उमेदवार निस्वार्थपणे आपल्या गावासाठी वेळ देऊ शकतो, अशाच सुशिक्षित व योग्य उमेदवारांना आपल्या ग्रामपंचायतीवर निवडून द्या आणि आपल्या गावाचा सर्वांगीण विकास त्यांच्या हातून करून घ्या.
आपल्यालाही आपल्या ग्रामपंचायतीचा डंका वाजवण्याचं यश मिळालं पाहिजे,
निवडून आलेल्या सरपंचांनी गावात विकास केल्यास ग्रामपंचायतीच्या नावाबरोबरच सरपंचाचेही नावलौकिक होणार आहे, त्यामुळे निवडून येऊन शासनाच्या तिजोरीतला पैसा कमावण्यापेक्षा गोरगरीब सामान्य जनतेच्या मनामध्ये आपलं नाव कमावणं अधिक चांगलं राहील, अनेक ठिकाणी आपण पाहतोय बाप सरपंच असेल तर मुलगा कारभार करतोय, आई किंवा बायको सरपंच असेल तर त्या घरातील व्यक्ती त्या ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळतोय, सरपंचाच काम फक्त अंगठा किंवा सही मारण्यापुरतच उरल आहे, इथून पुढे तरी गावकऱ्यांनी जागरूक होऊन सुशिक्षित व गावांमध्ये विकास करणारे सदस्य मायबाप गावकऱ्यांनी निवडुन द्यावेत अशी आशा सौ.बुध्दे यांनी यावेळी व्यक्त केली.