कारखान्याची आस्था असणारं संचालक मंडळ निवडून आणायचय !
सभासदांनो , खंबीरपणे पाठीशी राहा ...
- गणेश पाटील
पंढरपूर (प्रतिनिधी)
विठ्ठल कारखान्याची घडी परत बसवायची असेल तर, कारखान्याविषयी आस्था असणारं संचालक मंडळ निवडून आलं पाहिजे. पाच वर्षे चेअरमनपद देतो म्हणणाऱ्यांनाही आमची तीच मागणी होती. विठ्ठल कारखान्याचा सुवर्णकाळ पुन्हा आणण्यासाठी अशा संचालक मंडळाची गरज आहे. आणि यासाठीच आम्ही तीन दादा एकत्र आलो आहोत. सभासदांनी खंबीरपणे पाठीशी राहिल्यास हे शक्य होणार आहे , असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी व्यक्त केले. ते भटुंबरे येथील प्रचार सभेत बोलत होते. याप्रसंगी युवराज पाटील ,राजेंद्र पाटील, स्वप्निल जगताप महेश परचंडराव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठल कारखान्याची निवडणूक रंगतदार बनत चालली आहे. गाव भेट दौरे आणि बैठकांचा जोर वाढला आहे. युवराज पाटील यांच्या गटाने कार्यकर्त्यांच्या बैठका आणि कॉर्नर सभांवर जोर दिला आहे. बुधवारी सकाळी भटुंबरे येथे या गटाची प्रचार सभा पार पडली. या सभेस नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
बंद अवस्थेत असलेल्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटावर आगपाखड होत आहे. युवराज पाटील यांनी या निवडणूकीत स्वबळावर उडी घेतली, आणि विठ्ठल परिवारातून युवराज पाटील बाहेर पडले, असा आरोप भगीरथ भालके यांच्याकडून होऊ लागला. या आरोपाचे खंडन गणेश पाटील यांनी भटुंबरे येथील कॉर्नर सभेत केले आहे.
पाच वर्षे चेअरमनपद देतो म्हणणाऱ्यांनी संचालक मंडळ मात्र त्यांच्याच मर्जीतले देण्याचे ठरवले होते. विठ्ठल कारखाना आर्थिक गर्तेत सापडला आहे. त्यास बाहेर काढावयाचे असल्यास कारखान्याविषयी आस्था असणारे संचालक मंडळ निवडून येणे गरजेचे आहे .याकरताच चेअरमन पदास लाथ मारून आम्ही जनतेसमोर उभे आहोत.
अशा प्रकारचे संचालक मंडळ निवडून आणण्यासाठी शेतकरी सभासदांचे सहकार्य अवश्यक आहे. याकरीता सभासदांनी आपल्या पाठीशी उभे राहावे, असे मत गणेश पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भटुंबरे परिसरातील अनेक नेतेमंडळी आणि सर्व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
*कारखाना चालू करण्याची धडपड युवराज दादांची होती*
विठ्ठल कारखाना सुरु करण्याची खरी धडपड युवराज दादांनी केली होती. त्यांनाही मागे ओढण्याचे काम भगीरथ भालके यांनी वेळोवेळी केले आहे. युवराज दादांना मागे खेचण्याचे काम अनेक वर्षापासूनच सुरू आहे. सभासदांनी युवराज दादांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल्यास कारखान्याचा सुवर्णकाळ पुन्हा आणू , असा आत्मविश्वास गणेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.