एक वेळ संधी द्या ..
बाजारपेठ फुलवू .. अन सोन्याचा धुरही काढू ...
युवराज पाटील यांचे सभासदांना साकडे
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने विठ्ठलच्या गतवैभवास उजाळा मिळत आहे. विठ्ठल कारखाना म्हटले की पैसा आलाच. आणि पैसा म्हटलं की, पंढरपूरमधील बाजारपेठ नजरेसमोर आल्याशिवाय राहत नाही.
या निवडणुकीत फक्त एक वेळ संधी द्या, मग आपण बाजारपेठही फुलवू ...आणि सोन्याचा धूरही काढू .. असा आशावाद युवराज पाटील यांनी त्यांच्या गुरसाळे येथील प्रचार सभेत केला. यावेळी त्यांच्या समवेत गणेश पाटील, राजेंद्र पाटील यांशिवाय अनेक मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराने जोर पकडला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आधीपासूनच प्रचारास सुरुवात झाली आहे. या निवडणूक प्रचारात युवराज पाटील गटाने जोरदार मुसंडी मारली आहे .युवराज पाटील गणेश पाटील आणि ॲड. दीपक पवार या तिघांनी गावोगांव बैठका आणि कॉर्नर सभा घेण्यात आघाडी घेतली आहे. या गटाची बैठक मंगळवारी गुरसाळे येथे पार पडली. या बैठकीस अनेक सभासदांनी हजेरी लावली होती .यावेळी युवराज पाटील यांनी सभासदांना भावनिक साद घातली.
विठ्ठल कारखाना बंद असल्यामुळे या परिसरातील व्यवसायांवर परिणाम झाला आहे. किराणा व्यवसायापासून वीटभट्टी पर्यंतचे व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. विठ्ठल कारखाना जोमात सुरू झाल्यास आपल्या व्यवसायाची अवकळा दूर होऊ शकते , याची कल्पना या व्यावसायिकांनाही आहे.
कै. आ. औदुंबर अण्णांचा नातू म्हणून नको , फक्त एक वेळ संधी द्या. ही संधी दिल्यास कारखाना व्यवस्थित चालवून, या परिसरास पुन्हा गतवैभव मिळवून देऊ, बाजारपेठ फुलवू आणि पूर्वीप्रमाणे सोन्याचा धूरही काढू ; असा आत्मविश्वास युवराज पाटील यांनी सभासदांसमोर व्यक्त केला. सभासदांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला.