स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची गोपाळपूर येथील ‘मातोश्री वृध्दाश्रमाला’ भेट


स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची गोपाळपूर येथील ‘मातोश्री वृध्दाश्रमाला’ भेट



पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील ‘मातोश्री वृद्धाश्रमा’मध्ये आनंददायी वातावरण निर्माण करून उपस्थित वृद्धांमध्ये काहीकाळ उत्साह पसरविण्याचे स्तुत्य कार्य स्वेरीच्या फार्मसीमधील विद्यार्थ्यांकडून घडले. स्वेरी संचलित फार्मसीच्या तब्बल ९५ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी गोपळपुरातील श्री. संत तनपुरे महाराज ‘मातोश्री वृध्दाश्रमा’त जावून तेथील वृद्धांना आपुलकीची माया देऊन वृद्धांना ‘आपण स्वतःला एकटे समजू नका, आम्ही आपल्या सहवासातच आहोत’ हेच जणू सांगितले. 

        पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ एप्रिल रोजी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी ‘मातोश्री वृद्धाश्रमा’स भेट दिली. स्वेरी फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक प्रा. स्नेहल चाकोरकर यांनी ‘मातोश्री वृद्धाश्रमा’मध्ये येण्याचा हेतू स्पष्ट केला. तेथे पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर परिसरामध्ये वृक्षारोपण केले. वृद्धाश्रमातील सभागृहात मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी दिवसभर त्या वृद्धांच्या सहवासात राहून भावना जाणून घेतल्या. वृद्धांना देखील आधार वाटला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी पथनाट्य, कीर्तन, भावगीत, शास्त्रीय संगीत अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमातून वृद्धांना प्रफुल्लीत केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने दिलेल्या रकमेतून वृध्दाश्रमातील वृद्धांसाठी लागणाऱ्या आवश्यक असलेल्या काही वस्तू, फळे, खाद्यपदार्थांचे वाटप केले. यावेळी वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक धनंजय राक्षे यांनी वृद्धाश्रमाची स्थापने पासूनची सविस्तर माहिती दिली. यावेळी स्वेरीतील फार्मसी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डी. फार्मसीचे विभाग प्रमुख डॉ. अनिल लांडगे, प्रा. सिद्दीका इनामदार, प्रा. दिव्या झाडबुके आणि प्रा. ऋतुजा महामुनी आदी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अश्विनी यादव यांनी केले तर कु.ज्योती कसबे यांनी आभार मानले. या दरम्यान विद्यार्थ्यांना देखील आज्जी-आजोबांच्या सहवासात आहोत असा भास निर्माण झाला होता. परतताना विद्यार्थी व वृद्धांचे डोळे पाणावलेले होते, आम्ही परत नक्कीच येऊ असा विश्वास देऊन विद्यार्थ्यांनी निरोप घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad