*अभिजीत पाटलांनी आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांच्या मनावर कोरला जाईल - मा.उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील*
(महानाट्यात २५हजाराहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला)
प्रतिनिधी/-
छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी अभिजीत आबा पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजी या महानाट्याचे आयोजन केले आहे. लेखक दिग्दर्शक निर्माते महिंद्र वसंतराव महाडिक लिखीत शिवपुत्र संभाजी महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भुमीपूजन खा.डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक महानाट्याचा चौथा प्रयोग आज पार पडला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, पंढरपूर मंगळवेढा आमदार समाधान आवताडे, मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, धनश्री परिवारांचे अध्यक्ष शिवाजीराव कांळुगे सर, जकराया साखर कारखान्याचे चेअरमन बिराप्पा जाधव, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, उस्मानाबाद युवासेने नेते अतिश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या चौथ्या प्रयोगाचे उद्घाटन पार पडले.
अभिजित पाटलांनी हे जे महानाट्य आयोजित केले आहे या महानाट्यामुळे संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांच्या मनावर कोरला जाईल. अभिजीत पाटलांच्या या कार्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो असे वक्तव्य विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले.
याचबरोबर आमदार समाधान आवताडे यांनीही अभिजीत पाटलांच्या कार्याचे कौतुक करत स्तुतिसुमने उधळली. मागील दोन वर्षांपासून संपूर्ण देश हा कोरोनाने त्रस्त झाला होता. एकमेकांच्या गाठी भेटी बंद झाल्या होत्या परंतु अभिजीत आबांनी या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करून सर्वांना एकत्रित आणण्याचे व घराघरात छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास नेण्याचे काम केले आहे असे म्हणत अभिजीत पाटलांच्या सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्राच्या वाटचालीस शुभेच्छा देखील समाधान आवताडे यांनी दिल्या. .
इतकेच नव्हे तर, या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करून अभिजीत पाटलांनी सोलापूर जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा जपला आहे. अभिजीत पाटील साहेब यांनी केवळ पंढरपुरच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची सामाजिक बांधिलकी जपत या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन केले असून, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले असल्याचे मा. आमदार दत्तात्रय सावंत यांनी म्हंटले.
यावेळी पंढरपूर, सोलापुर नव्हेच तर संपूर्ण राज्यातून जवळपास पंचवीस हजारांपेक्षा जास्त शिवप्रेमी या ऐतिहासिक महानाट्याला उपस्थित असल्याचे दिसून आली. यावेळी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.