काँग्रेसच्या होमपिचवर सोलापूर भाजप जिल्हाध्यक्षांची जोरदार ‘हवा’

 काँग्रेसच्या होमपिचवर सोलापूर भाजप जिल्हाध्यक्षांची जोरदार ‘हवा’



  कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि भाजपने प्रचंड प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत ज्यांना गुलाल लागेल त्यांनाच राज्याचा कौल मिळेल असे वातावरण तयार झाल्याने महाविकास आघाडीसोबत भाजपच्याही राज्यभरातील नेत्यांनी कोल्हापुरात तळ ठोकला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरींनी चर्चेत आलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत भाजपने पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष, श्रीकांत देशमुख यांच्यावर कसबा बावडा या पालकमंत्री सतेज पाटील यांचे होमपिच असलेल्या विभागाची जबाबदारी सोपवून त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे. विशेष म्हणजे देशमुख यांनीही कसबा बावडा परिसर पिंजून काढत भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्यासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. या भागातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या रोज बुथनिहाय बैठका घेत देशमुख यांनीही विरोधकांच्या बालेकिल्ल्यातच धडकी भरविली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलेच रंग भरले आहेत. दरम्यान, काँग्रेस आणि पर्यायाने सतेज पाटील यांचे वर्चस्व असलेल्या कसबा बावड्यासारख्या मतांचे मोठे पॉकेट असलेल्या परिसराची जबाबदारी श्रीकांत देशमुख यांच्यावर देऊन भाजपने त्यांचे पक्षातील महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित केले असल्याची चर्चा आहे.  


कोल्हापुरातच पैलवानकी... जनसंपर्काचा लाभ

-श्रीकांत देशमुख हे तसे पट्टीचे पैलवान. जवळा(ता. सांगोला, जि. सोलापूर) या आपल्या मूळगावी नारायणदेव यात्रेनिमित्त राज्यातील सर्वात माेठे कुस्ती मैदान भरविल्याने ते राज्यभरात चर्चेत आले होते. त्यामुळे राज्यातील नामवंत पैलवानांसोबत त्यांचा नेहमीच घराेबा राहिला आहे. शालेय आणि कॉलेज जीवनात त्यांनी कोल्हापूरच्या तांबड्या मातीतच पैलवानकीचे धडे घेतल्याने येथील गल्ल्यान गल्ल्या त्यांना तोंडपाठ आहेत. येथील अनेक पैलवान-वस्तादांशी त्यांचा संपर्क असल्याने या निवडणुकीत त्यांना याचा फायदा होत असल्याचे चित्र आहे. नाना कदम यांच्या प्रचारासाठी ते फिरत असताना याचा प्रत्यय वारंवार येत आहे.


पंढरपूर पॅटर्न कोल्हापूर उत्तरमध्येही

कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारून महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली होती. अर्थात या यशाचे श्रेय भाजपबरोबर पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या संघटन कौशल्यालाही जाते. पंढरपूर पोटनिवडणुकीत देशमख यांनी आखलेले नियोजन, पक्षातील नेत्यांच्या प्रचारसभा, सोशल मीडियाच्या माध्यमातून राबविलेले कॅम्पेनिंग याची त्यावेळी जोरदार हवा झाली होती. या सगळ्यामागे देशमुख यांची रणनीती असल्याने ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या गुडबुकमध्ये गेले आहेत. त्यांच्या याच पंढरपूर पॅटर्नचा अनुभव कोल्हापूर उत्तरमध्येही व्हावा यासाठी श्रीकांत देशमुख यांच्यावर कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत महत्तवाच्या विभागाची जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad