माणसाची जुळवणूक आणि पैशाची गुंतवणूक योग्य पद्धतीने केल्यास उद्योग यशस्वी होतो.
-व्यवस्थापकीय सदस्य संजीव चित्रे
स्वेरीत उद्योजकतेवर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
पंढरपूर– ‘सध्या अनेक तरुण शिक्षित होवून देखील केवळ मोठ्या पगाराच्या अपेक्षेने नोकरी नसल्याने बेरोजगार आहेत. अशा विद्यार्थ्यानी नोकरीच्या मागे न लागता थोडीफार गुंतवणूक करून स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करावा. उद्योगात प्रचंड अभ्यास, प्रामाणिकता आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणताही उद्योग, व्यवसाय कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होतो. हा अनुभव आहे. यामुळे नोकरीची वाट न पाहता उद्योग सुरु करावा. त्या उद्योगात सहकारी मित्रांना सामील करून घ्यावे. महत्वाचे म्हणजे उद्योगात विश्वासा बरोबरच सांघिक कार्याची खूप गरज असते. अशावेळी ‘माणसाची जुळवणूक’ आणि ‘पैशाची गुंतवणूक’ योग्य प्रकारे केल्यास उद्योगात यशस्वी होता येते.’ असे प्रतिपादन सिलिकॉन व्हॅली (कॅलीफोर्नीया -युएस) मधील द यु ग्रुप, एलआयसीचे व्यवस्थापकीय भागीदार संजीव चित्रे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एन्टरप्रेनरशिप डेव्हलपमेंट सेल’ अंतर्गत ‘व्हाट नॉट टू डू इन एन्टरप्रेनरशिप’ या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन आयोजिलेल्या कार्यशाळेत व्यवस्थापकीय भागीदार संजीव चित्रे हे प्रमुख मार्गदर्शन करत होते. प्रारंभी मेकॅनिकल इंजिनिअरिंग अंतर्गत असलेल्या वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा. भास्कर गायकवाड यांनी प्रास्तविकात एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेबाबत सविस्तर माहिती दिली. सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी ‘व्यवसाय व उद्योग धंद्याचे वाढते महत्व’ सांगून तरुणांनी, अभियंत्यांनी नोकरीपेक्षा उद्योगात करिअर करावे’ हा कानमंत्र दिला. यानंतर चित्रे यांनी आपल्या मार्गदर्शनातून ‘उद्योजक म्हणजे काय, उद्योजकाच्या अंगी कोण कोणते गुण आवश्यक आहेत, यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय करावे, उद्योगात रिस्क कव्हर कसे घ्यावे, हाती घेतलेला व्यवसाय- उद्योग यात यशस्वी होण्यासाठी कोणकोणते गुण अंगी बाळगावे, उद्योगात फायदा- तोटा होत असताना नेमकी कोणती भूमिका घ्यावी, उद्योगात यशस्वी होण्यामागची कारणे, उद्योगासाठी लागणारे ज्ञान, आर्थिक गुंतवणूक कशी करावी, मार्केट कसे डेव्हलप करावे, आणि उत्पादने तयार करण्यासाठी लागणारी गुणवत्ता कशी आत्मसात करावी, असलेल्या मनुष्यबळाचा वापर कोठे आणि कशा पद्धतीने करावा? याच्यासह उद्योगाबाबत अनेक सूत्रे, कानमंत्र सांगून विद्यार्थ्यांनी, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक कसे व्हावे? कोणता उद्योग निवडावा? कच्च्या मालापासून ते पूर्ण तयार होणारा माल हा पुढे बाजारपेठेत जाऊन मालाची संपूर्ण विक्री कशी करावी, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात स्वेरीचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी असे मिळून जवळपास २७६ जण उपस्थित होते. यानंतर अनेकांनी उद्योग, व्यवसायावर आधारीत प्रश्न विचारले. यावर चित्रे यांनी समर्पक उत्तरे दिली. वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.