स्वेरीतील विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांना फायदा
- सहाय्यक व्यवस्थापक अक्षय मोरे
स्वेरीच्या ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ मध्ये पालक मेळावा संपन्न
पंढरपूर- ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये तंत्रशिक्षण क्षेत्रात विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांच्या माध्यमांतूनच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्टेज डेअरिंग, इंग्रजी संभाषण कौशल्य, उत्तम सादरीकरण अशा करिअरच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या गोष्टींमध्ये कमालीची वाढ होते. विद्यार्थ्यांमध्ये झालेला हाच गुणवत्तापूर्ण बदल ‘कार्पोरेट सेक्टर’ क्षेत्रात पदोनत्तीसाठी उपयोगी ठरतो.’ असे प्रतिपादन टीसीएस कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक अक्षय मोरे यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे आयोजिलेल्या ‘पालक मेळाव्या’त प्रमुख पाहुणे म्हणून स्वेरीचे माजी विद्यार्थी (सन-२०१५) व टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस) कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक अक्षय मोरे हे मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून प्रा. सर्जेराव शेळके व महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. नलिनी अचलारे हे उपस्थित होते. दिपप्रज्वलनानंतर विभागप्रमुख डॉ. एस. बी. भोसले यांनी प्रास्ताविकात पालक मेळावा आयोजित करण्याचा हेतू स्पष्ट करून विभागामध्ये घेतले जाणारे विविध शैक्षणिक उपक्रम, महाविद्यालयाला मिळालेली मानांकने व भविष्यात होणारे फायदे, पेटंटस, वर्षाचा नियोजित अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा, ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीची पुस्तके व संदर्भ ग्रंथ आदी विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी ‘विचार-२५’ या संशोधन प्रकल्पांमध्ये यशस्वी ठरलेले श्रीराम घोलप व चैतन्य सोनवणे तसेच पेटंट फाईल केल्याबद्धल सिद्धी मोरे, नुपूर आचलारे व शुभांगी सगर या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रा.अविनाश मोटे यांनी पालकांशी सुसंवाद साधताना विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या गेट परीक्षा, स्वेरी कॉलेजमध्ये येणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि प्लेसमेंट विभागाची कार्य करण्याची पद्धत आणि याला आलेले यश याबाबत महत्वाची माहिती दिली. यावेळी कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. पालक प्रतिनिधी प्रा. शेळके म्हणाले की, ‘स्वेरीमध्ये प्रवेश मिळविणे हा एक नशिबाचा भाग म्हणावा लागेल कारण विद्यार्थ्यांना लागलेल्या आदरयुक्त शिस्तीमुळे स्वेरीचे विद्यार्थी म्हणून नव्याने ओळख निर्माण होते म्हणून शिक्षणातून समृद्धीकडे जाताना स्वेरीमध्ये नियमित राबवत असलेल्या आदरयुक्त शिस्तीचा आणि संभाषणाचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यात होतो.’ यावेळी पालकांनी सूचना मांडल्या असता सर्व सूचनांची नोंद करून घेण्यात आली. सर्व प्रश्न वरिष्ठ पातळीवरून चर्चेद्वारे व विचारमंथन करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली व विभागातील इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने हा पालक मेळावा यशस्वीपणे घेण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील व लगतच्या जिल्ह्यातील जवळपास १५० पालक, संशोधन अधिष्ठाता डॉ.ए.पी.केने व विभागातील इतर प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रा.पी. बी. आसबे, प्रा. डी. टी. काशिद, प्रा. ए. के. पारखे, प्रा. सी. सी. जाधव यांच्यासह इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी गोफणे व ऋतुजा कदम यांनी केले तर डॉ. एन. यू. कौटकर यांनी आभार मानले.