जिद्द,चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होता येते
- नूतन उपविभागीय अधिकारी स्वप्नाली गायकवाड
स्वेरीमध्ये ‘सेसा-२०२२’ संपन्न
पंढरपूर- ‘सध्याचे युग स्पर्धेचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच ज्ञान, आत्मविश्वास आणि धाडसी वृत्ती हे गुण अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. सिव्हील इंजिनिअरिंगमध्ये विशेषतः बांधकाम क्षेत्रात अधिकाधिक ज्ञान असेल व सोबतीला धाडसीपणा नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग होणार नाही. सिव्हील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी, अभियंत्यांनी बांधकाम क्षेत्रासंबंधी असलेल्या विविध ठिकाणी प्रत्यक्ष जावून बांधकामाची व त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रज्ञानाची सखोल माहिती घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि प्रचंड परिश्रम करण्याची तयारी असेल तर सिव्हीलच काय, इतर प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होता येते.’ असे प्रतिपादन स्वेरीच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या व शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून नुकतीच निवड झालेल्या स्वप्नाली गायकवाड यांनी केले.
स्वेरीमध्ये आयोजिलेल्या ‘सेसा-२०२२’ (सिव्हील इंजिनिअरींग स्टुडंटस असोसिएशन) या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वेरी अभियांत्रिकीच्या सिव्हील इंजिनिअरींगच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या व नुकतीच शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून निवड झालेल्या स्वप्नाली गायकवाड या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या. प्रारंभी स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांनी ‘सेसा-२०२२’ या उपक्रमासंबंधी माहिती देवून ‘सेसा’ सारख्या संशोधनात्मक स्पर्धांच्या माध्यमातून संशोधनासाठी चालना मिळते.’ असे सांगितले. पुढे बोलताना उपविभागीय अधिकारी गायकवाड म्हणाल्या की, ‘विद्यार्थी दशेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु करायला हवी. तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांची कहाणी व अनुभव ऐकल्यास आपल्याला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रेरणा मिळते.’ असे सांगितले. या उपक्रमांतर्गत पेपर प्रेझेन्टेशन, कॅड रेस, बीजीएमआय, ब्रीज मेकिंग, ट्रेझरहंट व पोस्टर प्रेझेन्टेशन आणि क्वीझ कॉम्पिटेशन इ.स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सिव्हील इंजिनिअरिंग संबंधित बांधकामाच्या विविध प्रतिकृती तयार केल्या होत्या. यावेळी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, डॉ. व्ही.एस. क्षीरसागर, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. एन. डी. मोरे प्रा. श्रीकृष्ण गोसावी, प्रा. ए. बी. कोकरे, सेसा उपाध्यक्ष प्रेम पाटील, सचिव वैभवी कांबळे यांच्यासह ‘सेसा’चे पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग तसेच स्वेरीचे व इतर अभियांत्रिकी महाविद्यालयातील जवळपास दिडशेहून अधिक विद्यार्थी, स्पर्धक उपस्थित होते. ‘सेसा’चे समन्वयक वैभवी कांबळे व तेजश्री थिटे यांनी सुत्रसंचालन केले तर सेसाचे विद्यार्थी अध्यक्ष शिवराज परचंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.