*सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयआयसी विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न*
दि. ३१ जुलै २०२६ रोजी एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (आय आय सी) अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विभागांतील आयआयसी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. या कार्यक्रमास १०० हून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. स्वानंद कुलकर्णी, आयआयसी प्रेसिडेंट तथा उपप्राचार्य एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकता यांचे महत्त्व समजावून सांगत नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्ष उत्पादन व स्टार्टअपमध्ये कशा रूपांतरित करता येतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, आयडिया जनरेशन, प्रोटोटाइप डेव्हलपमेंट, आयपी क्रिएशन, आंत्रप्रेन्युअरशिप आणि इनोव्हेशन पार्टिसिपेशन या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जीवनातील समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याची प्रक्रिया, बौद्धिक संपदा हक्कांचे महत्त्व, तसेच उद्योजकतेच्या संधी याविषयी सखोल माहिती मिळवली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून संवादात्मक पद्धतीने सहभाग नोंदविला. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवोपक्रम आणि स्टार्टअप संस्कृतीबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात आयआयसीच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील इंक्युबॅशन मॅनेजर डॉ. अतुल आराध्ये तसेच आयआयसी समिती सदस्य प्रा. दत्तात्रय कोरके, प्रा. अनिता शिंदे, प्रा. मिलिंद तोंडसे, प्रा. धनश्री भोसले या समन्वयकांनी विशेष परिश्रम घेतले.

