*स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ‘मॉडर्न सर्व्हेईंग टेक्निक्स’ विषयावरील कार्यशाळेचे आयोजन*
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी "मॉडर्न सर्व्हेईंग टेक्निक्स" या विषयावरील तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सचिता प्रतिष्ठान, बारामती यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दि. २८ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक सर्व्हेक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येत आहे. टोटल स्टेशन, डी जी पी एस, विविध आधुनिक सर्व्हेक्षण उपकरणे, क्षेत्रीय मोजमाप तंत्रे तसेच प्रत्यक्ष सर्व्हेक्षण पद्धतींचे सखोल मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रावर उपकरणे हाताळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांचे तांत्रिक ज्ञान व व्यावहारिक कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत होत आहे.
अभियांत्रिकी शिक्षणातील सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील कामकाज यामधील दरी कमी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आधुनिक सर्व्हेक्षण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अचूक मोजमाप पद्धती आणि व्यावसायिक कौशल्यांचा विकास यावर विशेष भर देण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी सदर कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पार पाडले तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत असून कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे विशेष योगदान राहिले आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी अशा प्रकारचे उद्योगाभिमुख व प्रात्यक्षिक आधारित प्रशिक्षण उपक्रम भविष्यातही आयोजित करण्यात येणार असल्याचे विभागामार्फत सांगण्यात आले.

